जिल्ह्यातील सर्व धरणांत अवकाळी पावसाची दमदार हजेरी

बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये दमदार हजेरी लावली आहे.

तीन धरणे पुन्हा १०० टक्के भरली

पुणे : बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मोसमी पाऊस परतल्यानंतर अवकाळी पाऊस होईपर्यंत धरणांमधील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तीन धरणे पुन्हा १०० टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

 शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी संततधार पाऊस पडला. टेमघर धरण परिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात ८५ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात ८९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात ८५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चारही धरणांमधील पाणीसाठा २६.२६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९०.०६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. टेमघर धरणात सध्या ९४.६१ टक्के, वरसगाव आणि पानशेत धरणात अनुक्रमे ८८.७८ आणि ९८.२३ टक्के, तर खडकवासला धरणात ४५.७२ टक्के पाणीसाठा आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात ६० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या धरणात सध्या ८७.१५ टक्के पाणीसाठा आहे. मोसमी पाऊस परतल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यानंतर काही धरणांमधील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कळमोडी, चासकमान आणि उजनी धरणे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत, असेही निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदवण्यात आले.

जिल्ह्यातील अन्य धरणांमधील पाऊस मिलिमीटरमध्ये

पिंपळगाव जोगे ४७, माणिकडोह ५५, येडगाव ७६, वडज ६६, डिंभे ९४, घोड ३५, विसापूर १३, चिल्हेवाडी ५३, कळमोडी ८४, चासकमान ७३, भामा आसखेड ८२, वडीवळे ६४, आंद्रा ६९, कासारसाई ७८, गुंजवणी ८६, निरा देवघर ७१, भाटघर आणि वीर प्रत्येकी ८६, नाझरे ९८ आणि उजनी १५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rains dams district ysh