पुणे : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून, संबंधितांच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे.

मार्च महिन्यात जिल्ह्यात पुरंदर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड, हवेली, मावळ आणि मुळशी अशा आठ तालुक्यांमधील ८४ गावांतील ४०८.९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. १४३४ बाधितांचे जिरायती, बागायती आणि फळपीक क्षेत्र बाधित झाले होते. याकरिता जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून राज्य शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे, सातारा जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील दोन गावांतील चार शेतकऱ्यांचे ०.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुन्नरमधील आठ गावांतील २५३ जणांचे २५३ हे., शिरूरमधील तीन गावांतील ५२ शेतकऱ्यांचे २१.४० हे., आंबेगावातील आठ गावांतील ७२९ जणांचे २१३.७२ हे., खेडमधील १८ गावांतील १२५ जणांचे ३२.६४ हे., हवेलीतील पाच गावांतील २२ जणांचे १.७१ हे., मावळातील ३६ गावांतील २३० जणांचे ३६.९८ हे. आणि मुळशीतील चार गावांतील १९ शेतकऱ्यांचे ५.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. संबंधित लाभार्थ्यांचे तपशील शासनाच्या यादीनुसार भरण्यात येत आहेत. या याद्या तयार झाल्यानंतर संबंधितांच्या थेट बँक खात्यांत अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : रॅप प्रकरणाबाबत राज्यपालांनी विद्यापीठाकडून अहवाल मागवला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकसानीपोटी मंजूर अनुदान

पुरंदरसाठी ११,९०० रुपये, जुन्नर १९ लाख ७८ हजार ९३० रुपये, शिरूर तीन लाख ६३ हजार ८०० रुपये, आंबेगाव ३६ लाख ५९ हजार ३६५ रुपये, खेड पाच लाख ९६ हजार ६४० रुपये, हवेली २७ हजार ५५५, मावळसाठी तीन लाख ८२ हजार ९३० रुपये आणि मुळशीसाठी ४८ हजार ४५० रुपये असे ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.