पुणे :  पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तळेगाव, खालापूर यासह सातारा महामार्गावरील खेडशिवापूर तसेच नाशिक महामार्गावरील मोशी आणि राजगुरूनगर या टोलनाक्यांवर ‘फास्टटॅग’धारक वाहनचालकांकडून छुपी टोलवाढ सुरू झाली आहे.

टोल भरल्यानंतर रकमेपेक्षा जास्त पैसे घेतले गेल्याचे संदेश वाहनचालकांना प्राप्त होत असल्यामुळे छुपी टोलवाढ होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोणत्याही प्रकारची टोलवाढ करण्यात आलेली नाही, असा दावा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला आहे.

टोलनाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात आणि वाहनचालकांना काही मिनिटात टोल नाक्यावर पैसे भरून मार्गस्थ होता यावे, यासाठी केंद्र सरकारने प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना फास्टटॅग लावणे बंधनकारक केले आहे. नव्याने येणाऱ्या खासगी वाहनांनाही फास्टॅग लावण्याचे आदेश असून त्यासाठी डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र फास्टटॅग वापरकर्त्यांकडून टोलपेक्षा जादा रक्कम आकारली जात आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगांव, खालापूर टोलनाका, सातारा महामार्गावरील खेडशिवापूर, पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी, राजगुरूनगर टोलनाक्यावर हा फास्टटॅगचा प्रकार सुरू झाला आहे.

फास्टटॅग वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर कॅमेऱ्याद्वारे त्याची नोंदणी होते आणि वाहनमालकांच्या बँक खात्यातून  रक्कम टोलपोटी जमा होते. त्याचे संदेश चालकांना मोबाइलवर प्राप्त होतात. मात्र सध्या हे संदेश अर्धा तास उशिरा प्राप्त होत आहेत.