रॅगिंग केल्याप्रकरणी महाविद्यालयातून काढून टाकलेल्या आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) या महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेला बसता येईल. मात्र, या विद्यार्थ्यांचे निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत राखून ठेवण्यात येतील, असा निर्णय उच्च न्यायलयाने दिला आहे.
खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी एआयटीने गेल्या महिन्यात सात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले होते. रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार सात विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या निर्णयाला या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही, तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल,’ अशी बाजू विद्यार्थ्यांच्या वकिलांनी मांडली. त्याची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात यावेत, असा निर्णय न्यायालयाने दिला. न्यायाधीश एम. व्ही. मोहटा आणि न्यायाधीश एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणी जून महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे.