पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथील पडवळ नगर मध्ये पतंग उडवत असताना पतंगाचा मांजा हायटेन्शन वायर मध्ये अडकल्यामुळे तीन मुले विजेचा झटका लागून जखमी झाले आहेत. यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे तर दोघे जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.  १० वर्षीय आकाश प्रजापती हा गंभीर जखमी झाला आहे तर ७ वर्षीय आर्यन पांडे आणि ४ वर्षीय अभिनंदन पांडे या भावांना इजा झाली आहे. आकाशला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. आकाश ८० टक्के भाजला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  सकाळी ११ वाजता आकाश, आर्यन आणि अभिनंदन हे तिघे पतंग उडवत होते. खेळता खेळता पतंगाचा मांजा हायटेंशन वायरमध्ये अडकला. तो काढण्यासाठी आकाश पुढे झाला आणि त्याला विजेचा झटका बसला. त्याच्या सोबतच खेळत असणाऱ्या आर्यन आणि अभिनंदनलाही झटका बसला.  तिघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आर्यन आणि अभिनंदनवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High tension wire electric three kids injured in pimpri chinchwad
First published on: 25-01-2017 at 12:47 IST