३ ते ५ जानेवारी दरम्यान पुण्याजवळील सासवड येथे होणारे साहित्यसंमेलन म्हणजे साहित्यरसिकांना पर्वणी आणि १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणारे टी-२०  विश्वकरंडक क्रिकेटचे सामने म्हणजे क्रिकेटरसिकांना पर्वणी असणाऱ्या २०१४ सालातील लोकसभा निवडणुका म्हणजे पुढारी व मंत्र्यांना पर्वणी ठरणार असून, २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान आलेल्या चार सुट्टय़ा म्हणजे नोकरदार मंडळींना पर्वणी ठरणार आहे. २०१४ मध्ये ‘शनिवारी’ सुट्टी नाही.
६, १४ व २९ तारखांना डझनभर सुट्टय़ा (रविवारसह) असल्याने या तारखा सर्वाच्या आठवणीत राहतील. ६ ऑक्टोबरला सोमवारी बकर ईदची सुट्टी, तर ६ नोव्हेंबरला गुरुवारी गुरू नानक जयंतीची सुट्टी असून, ६ एप्रिल व ६ जुलैला रविवारची सुट्टी असणार आहे. १४ सप्टेंबर आणि १४ डिसेंबरला रविवारची सुट्टी असून, १४ जानेवारीला ईद-ए-मिलादची, १४ एप्रिलला नेहमीप्रमाणे डॉ. आंबेडकर जयंतीची (सोमवार), तर १४ मे रोजी बुद्धपौर्णिमेची सुट्टी असणार आहे. २९ जुलै रोजी रमज़ान ईदची सुट्टी असून, २९ जूनला रविवारची आणि २९ ऑगस्टला श्रीगणेश चतुर्थीची सुट्टी आहे.
‘ऑक्टोबर हीट’ नाही
तब्बल ९ सुट्टय़ांमुळे (रविवारसह) आणि पावसाच्या शक्यतेमुळे आणि दसरा- दिवाळी- बकर ईद सणांना जोडून सुट्टय़ा आल्याने ऑक्टोबर महिन्याची ‘ऑक्टोबर हीट’ कुणाला जाणवणार नाही. २ ऑक्टोबरला गुरुवारी म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीची सुट्टी, ३ ऑक्टोबरला शुक्रवारी दसऱ्याची, ५ ऑक्टोबरला रविवारची तर ६ ऑक्टोबरला सोमवारी बकर ईदची सुट्टी असून, २३ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाची व २४ ऑक्टोबरला बलिप्रतिपदेची आणि ५, १२, १९, २६ ऑक्टोबरच्या रविवारच्या सुट्टय़ांमुळे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवणार नाही.
‘एप्रिल’ आणि ‘ऑगस्ट’ या तीन अक्षरी महिन्यांत प्रत्येकी तीन सार्वजनिक सुट्टय़ा असून, दोन्ही महिन्यांत १८ तारखांना सुट्टी आहे. १८ एप्रिलला ‘गुड फ्रायडे’ची, तर १८ ऑगस्टला पारसी नववर्षदिनाची सुट्टी ‘गोपाळ काल्याच्या दिवशी’ सोमवारी आल्याने दहीहंडीचा उत्सव जोरात साजरा होईल. १८ एप्रिलला संकष्टी चतुर्थी असल्याने व सुट्टी मिळाल्याने गणेशभक्त खुशीत राहतील. दोन्ही महिन्यांत एकेक सुट्टी तारखेने मिळणारी असून, १९९७ आणि २००३ सालचे कॅलेंडर/ तारीख-वार सारखे २०१४ मध्ये आल्याने १९९७ व २००३ सालाप्रमाणे २०१४ मध्येही १४ एप्रिल सोमवारी व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) शुक्रवारी असणार आहे. ८ एप्रिलला श्रीरामनवमीची, तर २९ ऑगस्टला श्री गणेशचतुर्थीची सुट्टी!
१ मे, २ ऑक्टोबर व २५ डिसेंबर या एकाच वाराला येणाऱ्या सुट्टय़ा, १९९७ व २००३ सालाप्रमाणे २०१४ मध्येही गुरुवारी असणार आहेत.
४ नोव्हेंबरला मोहरमची, तर १९ फेब्रुवारीला छ. शिवाजीमहाराज जयंतीची सुट्टी असून, २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिना’ला महाशिवरात्रीची सुट्टी आल्याने सर्व महाराष्ट्रप्रेमी खुशीत राहतील.
१६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान असलेल्या टी-२० विश्व करंडक क्रिकेट सामन्यांच्या वेळी १६ मार्चला रविवारी होळीची, तर १७ मार्चला धूलिवंदनाची सुट्टी सोमवारी आहे. ३० मार्चला रविवारची, तर ३१ मार्चला आर्थिक वर्षांच्या शेवटी सोमवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. २४ मार्च व ६ एप्रिलला रविवारची सुट्टी आहेच.
२०१४ चेच कॅलेंडर २०२५ आणि २०३१ सालात सारखे (तारीख-वार सारखे) असणार आहे.