पुणे : पिंपरीतील एका रुग्णावर एकाच वेळी हृदय आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रत्यारोपणामुळे रुग्णाला जीवदान मिळाले आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली असून, अशा प्रकारे पहिल्यांदाच दोन्ही अवयवांचे प्रत्यारोपण एकत्रितपणे करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.
या रुग्णाचे वय ६० आहे. त्याने २००१ मध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेतले होते. मात्र, २०२४ मध्ये त्याचे मूळ प्रत्यारोपित मूत्रपिंड निकामी झाले. त्याचबरोबर डायलेटेड कार्डिओमायोपथीमुळे त्याच्या हृदयाचे कार्यही अत्यंत क्षीण झाले. डायलिसिस व अनेक औषधांवर अवलंबून असलेला हा रुग्ण डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. त्या वेळी त्याच्या सर्व चाचण्या करून त्याच्या प्रकृतीचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर एकाच वेळी हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका अवयवदात्याचे हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १० जूनला मिळाले.
डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र, शस्त्रक्रियेनंतरचा काळ आव्हानात्मक होता. रुग्णावर दोन भिन्न अवयवांचे एकत्रित प्रत्यारोपण झाल्यानंतर, उपचारांचा पुढील टप्पा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा होता. दोन्ही अवयवांची प्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार वेगवेगळे असल्यामुळे उपचारांत अचूक समन्वय आणि वैद्यकीय दक्षता आवश्यक होती. वैद्यकीय पथकाने दररोज बैठकांचे आयोजन करून उपचारांची दिशा ठरवली. रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून उपचारात आवश्यक ते बदल तत्काळ केले गेले. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो बरा होत आहे.
अवयव प्रत्यारोपणाबाबत सन्मान
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आणि अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील उपस्थित होत्या.