पुणे : हवाई दलाचा गणवेश परिधान करुन वावरणाऱ्या एकाला लष्करी गुप्तचर यंत्रणेने पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणी खराडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे दोन टी शर्ट, बिल्ले, शूज असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गौरवकुमार दिनेशकुमार (वय २५, रा. वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. अलिगड, उत्तर प्रदेश) असे या अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा घरातून दोन टी शर्ट, हवाई दलाचे बिल्ले (बॅज), शूज, जर्किन असा मुद्देमाल जप्त केला. हवाई दलाचा गणवेश त्याने महिनाभरापूर्वी जाळून टाकल्याची माहिती दिली आहे. त्याने हवाई दलाचा गणवेश का बाळगला, त्याने गणवेश परिधान करुन फसवणूक केली आहे का ? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
याबाबत पोलीस हवालदार रामदास पालवे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गौरवकुमार हवाई दलातील जवानांसारखा गणवेश परिधान करत असून, त्याने समाज माध्यमात छायाचित्र प्रसारित केले होते. तो एका उपाहारगृहात काम करत असल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला (मिलिटरी इंटलिजिन्स) मिळाली होती. तो नागरिकांच दिशाभूल करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा लावून त्याला पकडले.
विमानांचे छायाचित्र मोबाइलमध्ये आरोपी गौरवकुमार हा पुण्यात एकटा राहत होता. तो खराडी भागातील एका उपाहारगृहात काम करत होता. पोलिसांनी त्याच्या घरात छापा टाकला. त्याच्या घरातून एक ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याच्या मोबाइलमध्ये लढाऊ विमानांसोबत काढलेली छायाचित्रे आहेत. हवाई दलाच्या परिसरातील काही छायाचित्रे त्याच्या मोबाइलमध्ये आढळून आली आहे. हवाई दलाच्या जवानांचा गणवेश कोठून मिळविला, तसेच असे करण्यामागे त्याचा हेतू काय आहे ? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.