पिंपरी-चिंचवड : फुकटात दारू प्यायला दिली नाही म्हणून हॉटेल मॅनेजरला प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना चाकणमध्ये घडली. या प्रकरणी आरोपी गणेश नाणेकरला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॉटेल मॅनेजर दयानंद साधू शेट्टी यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश नाणेकर हा हॉटेल मयूरमध्ये सोमवारी रात्री उशिरा दारू प्यायला गेला. त्याला फुकटात दारू हवी होती. त्याला दारू दिली नाही, त्यामुळे हा अपमान आणि इगो हर्ट झाल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी गणेश नाणेकर हा थेट हॉटेलवर पोहचला.

“माझा इगो हर्ट झाला आहे. काल ज्या व्यक्तीने मला दारू दिली नाही, त्याला दहा मिनिटात माझ्या समोर उभा करा,” अशी दमदाटी करत हॉटेल मॅनेजर दयानंद साधू शेट्टीला प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. हा सर्व ड्रामा काही मिनिटे सुरूच होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घटनेनंतर चाकण पोलिसांनी आरोपी गणेश नाणेकरला तात्काळ अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळुंके यांनी दिली आहे. चाकण परिसरात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.