चोरटा गजाआड ; चोवीस लाखांचा ऐवज जप्त

सिंहगड रस्ता भागात चार दिवसांपूर्वी एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख ७२ हजारांचा ऐवज लांबवून पसार झालेल्या चोरटय़ाला पोलिसांनी पकडले. चोरटय़ाने सिंहगड रस्ता भागात भरदिवसा बारा घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून ७८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा चोवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुनील ऊर्फ सुशील बबन भोसले (वय २७, रा. रामनगर, पेरणे फाटा, भीमा कोरेगाव, मूळ रा. पखराबाज धानोरे, ता. जामखेड, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. २१ नोव्हेंबर रोजी सन युनिव्हर्स सोसायटीतील रहिवासी विद्या बोरा यांच्या सदानिकेचे कुलूप तोडून चोरटय़ाने ७ लाख ७२ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविला होता. त्या अनुषंगाने सिंहगड पोलिस ठाण्याचे पथक चोरटय़ाचा माग काढत होते. ज्या भागात घरफोडय़ा झाल्या आहेत. त्या सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेले चित्रीकरण पोलिसांकडून पडताळण्यात येत होते.

चित्रीकरणात संशयित चोरटय़ाचे वर्णन मिळाले होते. चोरटा ज्या मार्गाने गेला होता, त्या भागाची पाहणी करण्यात आली होती. आरोपी भोसलेने यापूर्वी कोथरूड, निगडी, चिंचवड, येरवडा भागात घरफोडय़ा केल्या होत्या. सिंहगड रस्ता भागातील घरफोडय़ा भोसलेने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला पकडले, अशी माहिती परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत दिली. त्याने सिंहगड रस्ता बारा घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून चोवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन खोडदे, उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, संतोष सावंत, सचिन माळवे, राहुल शेडगे, वामन जाधव, शिवा कायगुडे, पुरुषोत्तम गुन्ला, मयूर शिंदे यांनी ही कारवाई केली.

चोरी केल्यानंतर रिक्षाने पसार

आरोपी भोसले पेरणे फाटा भागातून सहाआसनी रिक्षाने नगर रस्त्यावर यायचा. तेथून पीएमपी बसने सिंहगड रस्ता भागात यायचा. सोसायटीत शिरल्यानंतर बंद सदनिकांची पाहणी करायचा व कटावणीच्या साहाय्याने सदनिकेचा दरवाजा उचकटून तो ऐवज लांबवयाचा. चोरी केल्यानंतर तो रिक्षाने स्वारगेट भागात यायचा आणि तेथून पीएमपी बसने पसार व्हायचा, असे तपासात निष्पन्न झाले आहे.