पिंपरी : भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात चार कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेला कृत्रिम धावमार्ग (सिंथेटिक ट्रॅक) उखडल्याने पुन्हा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी हा धावमार्ग दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगरमधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणचा चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम जुना धावमार्ग वर्षभरापूर्वी बदलण्यात आला. महापालिकेने चार कोटी रुपये खर्च करून हा नवीन धावमार्ग उभारला. १५ मार्च २०२४ रोजी एक वर्षानंतर खेळाडूंसाठी हा धावमार्ग खुला करण्यात आला. धावमार्गावर खेळाडू सराव करत असताना अवघ्या पाचच दिवसांत हा मार्ग उखडला होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी हा धावमार्ग बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. जून महिन्यात या मैदानावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिपाई पदाच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांची निवड क्षमता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हा धावमार्ग पूर्णपणे उखडला असून जागोजोगी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी पुन्हा धावमार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी, खेळाडू सरावापासून वंचित राहत आहेत. सरावाअभावी खेळाडूंच्या कामागिरीवरही परिणाम झाला आहे.
हेही वाचा >>>उरूळी देवाची, फुरसुंगी गावांवर पुणेकरांचे ५०० कोटी खर्च
याबाबत महापालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले की, दुरुस्तीसाठी धावमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. त्यासाठी सलग १५ दिवस पावसाची उघडीप मिळणे आवश्यक आहे. दुरुस्तीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. ठेकेदाराचे ५० लाख रुपयांचे देयक दिले नाही. अनामत रक्कमही महापालिकेकडे आहे.