आठवडय़ापूर्वी मी अमेरिकेहून परतलो. मी स्वत:हून नायडू रुग्णालयात तपासणी केली. मला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला नसल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. मात्र,करोनामुळे मला माणसं कळाली आणि त्यांच्या खोचक नजराही..
करोनामुळे सामान्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडे सोसायटीतील रहिवासी एका विशिष्ट नजरेतून बघत असल्याचा अनुभव कोथरूड भागातील एका नागरिकाने सांगितला. ते म्हणाले,की मी माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे.आठवडय़ापूर्वी मी अमेरिकेहून पुण्यात परतलो आणि मी स्वत: याबाबतची माहिती प्रशासन तसेच पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर मी नायडू रुग्णालयात गेलो.माझी वैद्यकीय तपासणी झाली. तपासणीत मला करोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मी घरातून बाहेर पडलो नाही. आणखी काही दिवस मी घरात राहणार असून समाजापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी सोसायटीत जेव्हा परतलो, तेव्हा मला थेट कोणी त्रास दिला नाही किंवा सापत्न वागणूकदेखील दिली नाही. मात्र, करोनामुळे मला माणसं कळाली. त्यांच्या खोचक नजरांची जाणीव मला झाली. आपत्तीच्या काळात माणसाने माणुसकी जपणे गरजेचे आहे. जर एखाद्याला अपमानास्पद आणि सापत्न वागणूक दिली जात असेल तर माणुसकी नावाचा शब्द हद्दपार होईल, असे त्यांनी नमूद केले.
दत्तवाडी भागातील एका सोसायटीतील दाम्पत्य आखाती देशातून नुकतेच पुण्यात परतले. दाम्पत्य सोसायटीत परतल्यानंतर त्यांच्याकडे सोसायटीतील रहिवासी एका विशिष्ट नजरेने पाहत होते.
त्यांची नायडू रुग्णालयात चाचणी करण्यात आली. चाचणीत त्यांना संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या हे दाम्पत्य समाजापासून घरात विलग राहत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
अफवा पसरविणारे संदेश
गेल्या काही दिवसात समाजमाध्यमातील काही गटांवर अफवा पसरविणारे संदेश प्रसारित पाठविले जात आहेत. असे संदेश पाठविणे गुन्हा आहे, याची जाणीव अनेकांना आहे. तरी एखाद्या सोसायटीच्या नावाने अशा प्रकारचे संदेश प्रसारित केले जात आहेत. सोसायटीतील एक रहिवासी परदेशातून आला असून तो करोना बाधित आहे, अशा प्रकारचे संदेश पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे संदेश गेल्या काही दिवसात वेगाने प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.