लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्याठिकाणी प्रामुख्याने परदेशी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. या ठिकाणी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी भारतातील तब्बल दहा हजार विद्यार्थी अडकले असून पुण्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज देण्याचे आवाहन मंगळवारी करण्यात आले.
किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये पाकिस्तानी नागरिक राहत असलेल्या वसतीगृहावर स्थानिक नागरिकांच्या संतप्त जमावाने हल्ला केला. त्यात काही विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होत स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरु केले असून परदेशी नागरिकांना लक्ष्य केल्याचे समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक शिक्षण संस्थांनी नियमित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तेथील अनेक परदेशी विद्यार्थ्यांना कोंडून ठेवल्याचेही समोर येत आहे.
आणखी वाचा-सीएनजी टंचाईने पुणेकरांचे हाल! रांगेत तब्बल आठ तास थांबण्याची वाहनचालकांवर वेळ
पुण्यातील रहिवासी डॉ. सोनाली राऊत आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या बहिणीने समाजमाध्यमांवर स्थानिकांकडून परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यासाठी गर्दी जमवण्यासाठी संदेश प्रसारित केले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याने अनेकांनी विमानाची तिकिटे आरक्षित केली आहेत. मात्र बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, किंवा विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने कार्यवाही
पुण्यातील १०० हून अधिक विद्यार्थी बिश्केकमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी अर्ज करून संपूर्ण माहिती द्यावी. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य शासन आणि राज्याकडून केंद्राकडे ही माहिती पाठविली जाणार आहे. त्यानुसार पुण्यातील विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित जाईल किंवा भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.