पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. वैष्णवी यांना सासरच्या मंडळींकडून झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवाइक यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (३० मे) पोलीस कोठडी सुनावली होती. तर, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नीलेश चव्हाण याचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. तर लता, करिश्मा आणि सुशील हगवणे यांच्या मोबाइलचा शोध सुरू आहे. चव्हाण आणि सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले संवाद, लघुसंदेश हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत असून, आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती त्यांनी न्यायालयास दिली.