पुणे : किरकोळ कारणावरून दाम्पत्यात वाद होतात. पती महिन्याचा किराणा माल भरत नसल्याने दाम्पत्यात झालेला वाद थेट न्यायालयात पोहोचला. दोघांनी एकमेकांविरुद्ध तीन वेगवेगळे दावे दाखल केले. मात्र, कौटुंबिक न्यायालयात करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे दोघांमधील वाद मिटला आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांनंतर दोघांमधील बेबनाव दूर झाला आणि न्यायालयात दाखल केलेेले तीन दावे तडजोडीने मागे घेण्यात आले.
या प्रकरणातील दाम्पत्याचा २००० मध्ये विवाह झाला. पतीचा फर्निचर विक्रीचा व्यवसाय आहे. महिला गृहिणी आहे. मोठा मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत असून, लहान मुलगी शाळेत जाते. पतीची आई घरखर्चाला मदत करत होती. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. पती वेळच्या वेळी किराणा माल भरत नाही, अशी तक्रार महिलेने केली होती.
दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वाद कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. पतीने विभक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. महिलेने तात्पुरत्या पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. कौटुंबिक न्यायालयाने महिलेचा अर्ज मंजूर करत तिला आणि मुलीला दरमहा सात हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. मात्र, पतीने तीन वर्षे पोटगी दिली नाही. त्यामुळे दोन लाख अठरा हजार रुपयांची थकीत पोटगी मिळावी, यासाठी महिलेच्या वकिलांनी न्यायालयात दाद मागितली. विभक्त होणे, पोटगी आणि थकीत पोटगी असे तीन वेगवेगळे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले.
कौटुंबिक न्यायालयाने हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठविले. महिलेकडून ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे आणि पतीकडून ॲड. प्रियंका जहागीरदार यांनी काम पाहिले. या प्रकरणात समुपदेशक शानूर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समुदेशनामुळे दाम्पत्यातील कटुता कमी झाली, तसेच मुलांच्या भवितव्याचा विचार करून दोघांना एकत्र येण्याचे सांगण्यात आले.
दोघांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तडजोड करण्याचे ठरविले. त्यानुसार पतीने महिलेला घरखर्चासाठी दरमहा सात हजार रुपये, वर्षभरात थकीत पोटगीचे दोन लाख रुपये आणि तिचे गहाण ठेवलेले बारा तोळे सोने देण्याची तयारी दाखविली. मुलीचे संपूर्ण शिक्षण आणि विवाहाच्या खर्चाची जबाबदारी घेतली. त्यानंतर महिलेने पतीविरुद्ध दाखल दावे मागे घेण्यास संमती दिली.
दाम्पत्यातील किरकोळ वादातून टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठविण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. समुपदेशनामुळे दोघांमधील वाद मिटला. मुलांच्या भवितव्याचा विचार करून दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. – ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे