सतत सुचणं आणि सुचलेल्या गोष्टीचा ध्यास घेणं हीच अभिजातता आहे. असे न करता केवळ जुन्याचीच कास धरणार हा आग्रह धरणार असू तर, मग गाणं संग्रहालयात ठेवावं लागेल, असे मत ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. माझ्यामध्ये कोणतेही ‘कन्फ्यूजन’ नसल्यामुळे ‘फ्यूजन’ प्रकाराला मी सामोरा गेलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘अंतरंग’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ समीक्षक डॉ. विकास कशाळकर यांनी पं. अजय पोहनकर यांच्याशी संवाद साधला. मातोश्री सुशीलादेवी पोहनकर यांच्याकडून किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची मिळालेली तालीम, १९५९ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात झालेले गायन या आठवणींना उजाळा देत पोहनकर यांची सांगीतिक जडणघडण उलगडली.
घराणं अभिजात असण्यापेक्षा सूर अभिजात असतो, असे सांगून पं. अजय पोहनकर म्हणाले, ‘जे चांगलं ते आपलं घराणं’ असेच आईने शिकविले. त्यामुळेच पूर्वग्रह न ठेवणारा मी कलाकार आहे. रुक्षपणा म्हणजेच शास्त्रीय असते का. रागाची मोडतोड न करता चौकटीमध्येही काही चांगले करणे योग्य नाही का. त्यादृष्टीने उस्ताद अमीर खाँ आणि पं. भीमसेन जोशी यांचा अनेक कलाकारांवर प्रभाव आहे. रसिकाला गायनातील कळत नसते. तो केवळ गायनातून आनंद घेतो. विद्वान फूटपट्टी लावून चिकित्सकपणा दाखवितात.
घराण्यामुळे कलाकार घडत नाहीत, तर कलाकारामुळे घराणे मोठे होत असते. पं. मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरीताई आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांच्यामुळे घराणे मोठे झाले, असे सांगून पं. पोहनकर म्हणाले, आपल्या आवाजाला काय शोभते हे जाणून घेत गायला पाहिजे. गाण्यामध्ये सुरांचा प्रभाव असतो. ताल आलाच पाहिजे. तालामुळे चमत्कृती येते. केवळ तालमय असण्यापेक्षा लयकारी असली पाहिजे. ताल आणि लय बरोबरीने चालले पाहिजेत. बहुआयामी प्रतिभेच्या कलाकारावर स्टॅम्प मारणे योग्य होणार नाही.

लघुपटातून उलगडली
‘सुरील्या दरवेशा’ची कथा
महोत्सवातील ‘षड्ज’ उपक्रमांतर्गत प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर निर्मित आणि दिग्दर्शित ‘एक सुरीला दरवेश: रजब अली खाँ’ हा लघुपट दाखविण्यात आला. कोल्हापूर येथे घेतलेली गायनाची तालीम ते देवास संस्थानचे राजदरबारचा गायक ही उस्ताद रजब अली खाँ यांची सुरीली वाटचाल या लघुपटातून उलगडली. दररोज साधना केल्यावर शंभर गॅ्रम साजूक तुपातील हलवा खाऊन शिष्यांना तालीम देणारे गुरू, तानसमृद्ध गायकीचे बादशहा, कुस्तीगीर आणि लाठीकाठी विद्येबरोबरच गायनामध्ये वैविध्य यावे यासाठी रुद्रवीणावादनामध्ये मिळविलेले प्रावीण्य ही रजब अली खाँ यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध रुपे पाहण्यास मिळाली. १९५४ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केलेला गौरव आणि संगीत नाटक अकादमीने त्यांना प्रदान केलेले प्रमुख आचार्यपद हे पैलू अनुभवता आले.