पुण्यातील फर्ग्युसन विद्यालयात नरेंद्र मोदींनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शनिवार विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनपर भाषण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले.
“मूळात मला अॅनिमेटर व्हायचे होते. अपघाताने राजकारणात आलो” असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी जाग्या केल्या. तसेच काही करता येत नाही म्हणून मी राजकारणात आलो नाही. असे म्हणत इतर राजकारण्यांना त्यांनी आपल्या भाषेत टोलाही मारला.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना कामही अनुभवावे याचे उदाहरण देताना, लोकसत्तामध्ये प्रशिक्षणार्थी व्यंगचित्रकारम्हणून काम करत होतो याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.
मूळात शाळेतच चित्रकला विकल्प विषय म्हणून शिकविला जात असेल, तर विद्यार्थ्यांकडे डिझाईनिंगची कला येणार तरी कशी? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रसिद्ध आणि जून्या विद्यापीठांच्या बाबतीत बोलत असताना राज ठाकरेंनी बिहारमधील नालंदा विद्यापीठाचाही उल्लेख केला. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठाचे उदाहरण देत बिहारमध्ये आहेत काही चांगल्या गोष्टी, माफ करा होत्या! असा उपरोधीक टोलाही राज ठाकरे मारायला विसरले नाहीत.
इंग्रजांनी उभ्या केलेल्या वास्तूंची स्तुती आपण करत बसतो पण, अशा वास्तु आपण का नाही करू शकत असे म्हणून प्रयत्न करणारे आपल्याकडे नाहीत हेच आपले दुर्भाग्य असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच इथल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची बांधणी आपल्या शासनाला नीट करता येत नाही. मग, आजच्या विद्यार्थ्यांना अशा विद्यापीठांच्या बांधणीचे प्रोत्साहन तरी कसे मिळणार. महाराष्ट्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे बांधकाम, वास्तुशिल्प, इमारतींचे डिझाईनिंग या क्षेत्रातही काहीतरी नवे करण्याची तयारी आताच्या विद्यार्थ्यांनी ठेवावी. त्यातूनच महाराष्ट्राची प्रगती होऊ शकेल. असेही राज ठाकरे म्हणाले.
त्यावेळी पक्षातून बाहेर पडताना माझ्याकडे राजकारणातून संपुर्णपणे बाहेर पडणे किंवा नवा पक्ष उभारणे दोन पर्याय होते. मी पक्ष उभारला, कारण मी समाजाचे काही देणे लागतो. त्यामुळे राजकारणात राहण्याचे ठरविले. त्यानुसार मी पक्षाची आखणी केली. अशीच आपल्या करिअरची आखणी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. ज्या क्षेत्रात काम करू त्यात आपण समाजाचे काही देणे लागतो हे विसरता कामा नये असेही राज ठाकरे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2013 रोजी प्रकाशित
‘मी अपघाताने राजकारणात आलो’- राज ठाकरे
पुण्यातील फर्ग्युसन विद्यालयात नरेंद्र मोदींनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
First published on: 31-08-2013 at 07:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I came in politcs by accidentally raj thackeray