मार्चमधील अधिवेशनात निर्णय घेण्याबाबत सामंत यांची माहिती
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेचा प्रचार आणि प्रसार राज्यभरातील प्रत्येक विद्यापीठात झाला पाहिजे. ही योजना राज्य शासनातर्फे व्यापक पद्धतीने राबवल्यास शेतकऱ्यांची मुले, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. त्याबाबत मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११९ व्या पदवीदान कार्यक्रमात सामंत बोलत होते. ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. करमळकर यांनी अहवालाद्वारे विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेताना विद्यापीठाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच नवीन उपक्रमांची माहिती दिली.
मराठी भाषेसाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. त्यामुळे पदवी प्रदान कार्यक्रम मराठीतही घेण्याची सूचना सामंत यांनी केली. सामंत म्हणाले, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कुवेतमध्ये शैक्षणिक केंद्र सुरू करणे अभिमानास्पद आहे. विद्यापीठाने लोकप्रतिनिधींशी सुसंवाद निर्माण केल्यास विद्यापीठाला जिल्हा नियोजन समिती, खासदार निधी, आमदार निधीतून निधी प्राप्त करता येऊ शकतो. राज्य शासन आणि विद्यापीठाने एका गतीने चालत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत. पुण्यात प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर बारामतीमध्ये उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी यशदासह सामंजस्य करार केला जाणार आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यापीठांमध्ये संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता आहे.
भारत-ऑस्ट्रेलियाची ९ हजारहून अधिक एकत्रित संशोधने
जग सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात असले, तरी नवसंकल्पनांच्या माध्यमातून वेगाने बदलणाऱ्या जगात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थी बदलत्या काळानुसार शिक्षण घेत जगासाठी आपले योगदान देतील याची मला खात्री वाटते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१७ पासून ९ हजार एकत्रित संशोधने झाली आहेत. या दोन्ही देशांचे अनेक नैसर्गिकरित्या समान दुव्यांवर एकत्रित संशोधन आणि अभ्यास होऊ शकते, असे ट्रसवेल यांनी सांगितले.