राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस काढण्याचे काम मुंबईतील शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मग त्यांना पाणी प्यावं लागलं, गुंडांना आम्ही पाणी कसे पाजतो, असे म्हणत राज्यमंत्री रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते पिंपरी मधील शिवसेनेच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि अनेक नेते उपस्थित होते.

अजित दादा म्हणतात शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर भाजप अल्पमतात येईल. अहो अजित दादा पहिलं शरद पवार यांना विचारून घ्या, तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत असाल की भाजपसोबत असाल किंवा बाहेरून की आतून पाठींबा असेल हे शरद पवार यांना विचारा, असा सवाल कदम यांनी अजित पवार यांना विचारला. विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या आधीच शरद पवार यांनी जाहीर करून टाकले, भाजपला आमचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे निर्णय घेण्यास सक्षम आहेत आम्हाला कोणच्या सल्ल्याची गरज नाही असं म्हणत राज्यमंत्री यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री आले आणि ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे त्यांना जेलमध्ये टाकणार अशी धमकी देऊन गेले. मात्र, आम्ही एका विटेलाही हात लावून देणार नाही. तसा प्रयत्न केलाच तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात तो आम्ही टेकू काढून घेऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी दिला.