आयएलएस विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. हा विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत शिकत होता. काही महिन्यांपूर्वीही एका विद्यार्थ्यांने अशाच प्रकारे आत्महत्या केली होती.
सिद्धार्थ काळे (वय २४, रा दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सिद्धार्थ याने पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी २००९-१० या शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सध्या तो पाचव्या वर्षांचे शिक्षण घेत होता. त्यामुळे त्याला वसतिगृहामध्ये स्वतंत्र खोली देण्यात आली होती.
शनिवारी पावणेबाराच्या सुमारास सिद्धार्थची खोली बंद असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी खोलीमध्ये डोकावून पाहिले असता, सिद्धार्थने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत वसतिगृहाचे व्यवस्थापक व महाविद्यालयाच्या प्रशासनाला माहिती दिली. महाविद्यालयाने तातडीने पोलिसांकडे याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.