देशातील आरोग्य सुविधांनी यापूर्वी करोना महासाथीच्या गंभीर लाटांना तोंड दिले आहे. परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सक्षम असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. केंद्र आणि राज्य शासनाने लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राष्ट्रीय शाखेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>एक पदवी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या पदवीसाठी तीन वर्षांचे बंधन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
उपलब्ध माहितीनुसार अमेरिका, ब्राझील, चीन, जपान अशा जगातील प्रमुख देशांमध्ये २४ तासांमध्ये सुमारे ५.३७ लाख नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या बीएफ.७ या प्रकारामुळे झालेली ही रुग्णवाढ चिंताजनक असली तरी महासाथीच्या प्राथमिक टप्प्यात भारतीय आरोग्य यंत्रणेने अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे भारतातील या संभाव्य रुग्णवाढीचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत गांभीर्य बाळगावे, असे आवाहन ‘आयएमए’ने पत्राद्वारे केले आहे. आयएमएच्या सर्वस्तरीय शाखांनीही आवश्यक सावधगिरी बाळगावी, असे ‘आयएमए’ने पत्रात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>सुनील शेळके : मावळचे ‘जनसेवक’
आयएमए’चे महासचिव डॉ. जयेश लेले म्हणाले,की भारतातील करोना रुग्णसंख्येची सद्य:स्थिती घाबरून जावे अशी नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हे केव्हाही उत्तम ठरते. करोना काळातील नियमांचे पालन पुन्हा करणे, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे, हात धुणे, प्रवास टाळणे आणि कोणत्याही विषाणूजन्य आजारांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.वर्धक मात्रेसह करोना लसीकरण पूर्ण करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.