राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच,  पुणे शहरातील काही वॉर्डात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. त्या वॉर्डात भिलवाडा किंवा बारामती पॅटर्न राबवता येईल का? अशी चर्चा झाली असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

करोना विषाणूंचे रुग्ण मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या समवेत बैठक झाली. त्यानंतर अनेक प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरातील ज्या वॉर्डात रुग्ण आढळत आहे. त्या ठिकाणी लोकांना पुढील किमान दहा दिवसाच रेशन देऊन त्यांना घरातच बसवता येईल असं काही करता येईल का? याचा विचार करण्याची गरज आहे. असे झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. तसेच या कामासाठी मिलिट्रीमधील जे निवृत्त लोक आहेत त्यांना या कामासाठी घेण्यात यावे. यासाठी लागणार निधी सर्व स्तरातून गोळा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील परप्रांतीय लोकांना रेल्वेने सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, याबाबत केंद्राला निर्णय करावा लागेल, पण रेल्वे सुरू होण शक्य आहे. जे परप्रांतीय आपल्या राज्यात आहे. त्यासाठी एसटीच्या माध्यमातून त्यांना सोडविणे योग्य ठरले. हे करीत असताना आरोग्य विभागामार्फत ठरवून दिलेल्या नियमांच पालन कराव. मात्र यावर काय निर्णय होतो, हे पाहावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीकडून राजकारण सुरू : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर भाजपा राजकारण करत असल्याचा  आरोप केला जात आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधान परिषदेत मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिने बाकी असताना आणि करोना सारखं संकट असताना ही वेळ का आली? असा सवाल उपस्थित करीत हे प्रकरण टाळता आलं असतं, 28 मे पर्यत उद्धव ठाकरे यांना धोका नाही. आमचा त्यांना विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.