पिंपरी- चिंचवड: अजित पवारांनी श्रीरंग बारणेंसाठी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी त्यांच्या शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. कार्यकर्त्यांनो गंमत- जमत मध्ये काही करू नका. काही केलं तर लगेच कळतं. तुम्ही गंमत- जंमत केली (बारणे विरोधात काम) तर तुमचा बंदोबस्त करेल, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम देत श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. सत्तेत राहून विकास काम करण्यासाठी महायुतीत सहभागी झालो, असं ही अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पिंपरीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, माझं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे. गंमत- जंमत करण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी म्हणजे, गंमत – जंमत केली तर लगेच कळतात. तुम्ही गंमत – जंमत केली, मी तुमचा बंदोबस्त करेल. ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. पुढे ते म्हणाले, मॅच फिक्सिंग करायची नाही. इमाने इतबारे श्रीरंग बारणे यांचं काम करायचं आहे. माझा शंभर टक्के पाठिंबा शिरूरमध्ये शिवाजी आढळराव आणि मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनाच आहे.

हेही वाचा : अंगावरून साप गेला आणि आठ दिवसांनी शरद पवार मुख्यमंत्री झाले; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण

पुढे ते म्हणाले, विकास काम करण्याकरिता महायुतीत सहभागी झालो आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. यशवंतराव चव्हाण सांगायचे शेवटच्या घटकाच्या मदतीकरिता सत्ता लागते. सत्ता नसेल तर आपण विरोधी पक्षात असू. आंदोलन, मोर्चा, उपोषण, भाषण करू शकतो. यापेक्षा पुढे काही नाही. म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असल्याने महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत.