पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर आणि लाड-पागेअंतर्गत नोकरी मिळाल्यानंतर आई-वडील, सासू-सासऱ्यांना सांभाळण्यास नकार देणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पाच वर्षांत लाड-पागेअंतर्गत ३०७, तर अनुकंपा तत्त्वावर १३७ असे ४४४ कर्मचारी महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. आरोग्य विभागामध्ये काम करणारे सफाई कर्मचारी निवृत्त होण्यास काही वर्षे बाकी असतानाच वारसांच्या पुढील आयुष्याची सोय म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतात. कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वानुसार, तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्त्या दिल्या जातात. पात्र वारसदार व्यक्तीद्वारे कुटुंबीयांचा सांभाळ करण्याबाबत महापालिका सेवेत रुजू होण्यापूर्वी स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र किंवा बंधपत्र प्रशासनास सादर करतात.

हेही वाचा – जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस, ७ जुलैनंतर जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नोकरी मिळेपर्यंत आई-वडील, सासू-सासऱ्यांचा वारस सांभाळ करतात. मात्र, नोकरी मिळताच सांभाळ करण्यास नकार देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्याबाबत स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी घेऊन येत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, चार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतरही हे कर्मचारी सुधारले नाहीत, तर बंधपत्राच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्याला पालिका सेवेतून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

नोकरी लागल्यानंतर वारस सांभाळ करत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. वायसीएम रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे हे या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणार आहेत.

हेही वाचा – महापालिकेच्या आवारात एक लाखांची लाच मागणारा कर्मचारी गजाआड

चार कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच नऊजणांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad mnc the administration has issued a notice to employees who refuse to take care of parents after getting jobs on compassionate basis pune print news ggy 03 ssb
First published on: 01-07-2023 at 09:07 IST