पिंपरी-चिंचवडमध्ये वंशाचा दिवा म्हणजे मुलगा होत नसल्याने दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी देऊन जीव घेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. घटने प्रकरणी पत्नी रत्ना मिठाईलाल बरुड, शिवम दुबे आणि अमन पुजारी अशी हल्लीखोरांची नावं आहेत. निगडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रत्नाने पतीला जीवे ठार मारण्यासाठी शेजारीच राहत असलेल्या शिवम आणि अमन यांना पाच लाखांची सुपारी दिली होती. अखेर या तिघांचा भांडाफोड पोलिसांनी केला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी रत्ना आणि मिठाईलाल बरुड हे दाम्पत्य पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात राहतं. या दांपत्याला एकूण आठ मुली असून पैकी एका मुलीचा मृत्यू काही महिन्यांपूर्वी झाला. मिठाईलालला सात मुली असल्याने मुलाची अपेक्षा होती, त्याला वंशाचा दिवा हवा होता. या कारणावरून तो पत्नी रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ नेहमी करायचा. काही दिवसांपासून मिठाईलालच्या मनात वंशाचा दिवा हवा असल्याने दुसरा विवाह करण्यासंबंधी विचार येत असायचा. याची माहिती पत्नी रत्नाला मिळाली आणि रत्नाने पती मिठाईलालची हत्या करण्याचं ठरवलं. नोव्हेंबर महिन्यापासून रत्ना पतीला मारण्यासाठी प्लॅन तयार करत होती. अखेर शेजारीच राहत असलेले सराईत गुन्हेगार शिवम दुबे आणि अमन पुजारी या दोघांना पाच लाखांची सुपारी दिली. ऍडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये तीस नोव्हेंबर रोजी रत्नाने अमन पुजारीकडे दिले.

हेही वाचा… आगीच्या दुर्घटनेनंतर पिंपरी महापालिकेकडून हालचाली; ‘या’ ठिकाणी होणार जळीत कक्ष

हेही वाचा… पुणे : लोणी काळभोर भागात फर्निचरच्या गोदामाला आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी सात डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पत्नी रत्ना शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा, तिने अमन पुजारी ला फोन करून पती आतील बेडरूम मध्ये झोपला असल्याची माहिती दिली. रत्नाने आधीच घरातील टीव्ही जवळ धारदार कोयता आणून ठेवला होता, तर रत्नाने दिलेल्या पैशातून अमन पुजारीने चाकू विकत घेतला होता. अमन आणि शिवम थेट घरात शिरले आणि त्यांनी बेसावध असलेल्या मिठाईलालवर सपासप तब्बल २० ते २१ वार केले. पाठीतून पोटात चाकुने भोकसले, चेहऱ्यावर, हातावर वार केले. घरात मुली असल्याने मुलींनी हा सर्व थरार बघून आरडाओरडा केला. घाबरलेले शिवम आणि अमन त्या ठिकाणाहून पसार झाले. गंभीर असलेल्या मिठाईला तातडीने मुलींनी इतर नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. मारेकर्‍यांना रत्नाच्या मुलीने पाहिलं होतं त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिने स्पष्ट त्यांची नावे घेतली. काही तासांमध्येच दोघांनाही निगडी पोलिसांनी अटक केली. आधी मिठाईलाल याच्यावर जीवघेणा हल्ला का? केला याबाबत बोलण्यास आरोपी तयार नव्हते. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी रत्नानेच पती मिठाईलाल ला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आलं. दुसरं लग्न आणि सात मुली असल्याने होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळातून सुपारी दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रत्ना मिठाईलाल बरुड, अमन पुजारी आणि शिवम दुबे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान हे करत आहेत.