पुणे : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ गावातील ११ वर्षांच्या मुलाला छोट्या जखमेतून धनुर्वात झाला. त्याचे लहानपणापासून धनुर्वाताचे लसीकरण झाले नसल्याने आजार झपाट्याने बळावला. या मुलाला वारंवार झटके येऊ लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले. ससूनमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनंतर अखेर अडीच महिन्यांनी हा मुलगा बरा झाला आहे.
या मुलाला ससून रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास होत असल्याने त्याला जवळपास ५७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. या काळात त्याला अनेक गुंतागुंतींना सामोरे जावे लागले. उपचारादरम्यान त्याला न्यूमोनिया झाला आणि त्यावर तातडीने औषधोपचार करावे लागले. दीर्घकाळ अतिदक्षता विभागात राहिल्याने या मुलाच्या शरीरात प्रथिने व उष्मांकाची कमतरता निर्माण झाली. वारंवार येणाऱ्या झटक्यांमुळे औषधांच्या मात्रेत सतत बदल करावा लागला. संसर्गाचा धोका कायम असल्याने डॉक्टरांपासून परिचारिकांचे पथक या मुलावर सातत्याने लक्ष ठेवत होते.
ससूनमध्ये उपचार सुरू असताना हळूहळू मुलाची प्रकृती सुधारत गेली. सुमारे दोन महिन्यांनंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यानंतर त्याला सहा दिवस बालरोग अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. पुढे त्याला पंधरा दिवस बालरोग विभागाच्या कक्षामध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. अडीच महिन्यांहून अधिक काळाच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता हा मुलगा स्वतः हाताने जेवतो, चालतो-बोलतो आणि पूर्वीसारखा दैनंदिन कामे करीत आहे. बालरोगचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय राजपूत आणि डॉ. राहुल दावरे, सहायक प्राध्यापक डॉ. सुविधा सरदार यांच्यासह निवासी डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकाने हे उपचार केले.
आईच्या प्रयत्नाला वैद्यकीय पथकाची साथ
मुलाचे वडील नसल्यामुळे आईने दीर्घ काळ रुग्णालयात राहून मुलाची काळजी घेतली. तिला बालरोग विभाग व वैद्यकीय समाजसेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साथ दिली. तिच्या जेवणखाण्यासह इतर गोष्टींची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी उचलली.
नवजात धनुर्वात अजूनही काही भागात दिसतो, कारण गर्भवतींना लसीकरण मिळत नाही अथवा प्रसूती अस्वच्छ परिस्थितीत होते. हे पूर्णपणे टाळता येऊ शकते. गर्भवतींना टिटॅनस लस देणे आणि स्वच्छ प्रसूती करणे अत्यावश्यक आहे. गर्भवतींना ही लस मिळाली नसेल तर जन्मानंतर बाळाला टिटॅनस इम्युनोग्लोब्युलिन देता येते. प्रतिबंध हा नेहमी उपचारापेक्षा अधिक परिणामकारक असतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. – प्रा. डॉ. आरती किणीकर, विभागप्रमुख, बालरोगचिकित्साशास्त्र, ससून रुग्णालय