पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी प्रचाराची धामधूम सुरू असून पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके या चार ही उमेदवारांकडून प्रचार करण्यात येत आहे. या प्रचारादरम्यान प्रत्येक उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याची एक ही संधी सोडताना दिसत नाही. आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघाने निर्णायक भूमिका बजावला. कारण हा मतदारसंघ भाजपचा बालकिल्ला राहिला आहे. पण मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते हेमंत रासने यांचा रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यानंतर हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांच्यात फ्लेक्सबाजी मधून एकमेकांना लक्ष केल्याचे पाहण्यास मिळाले आहे. या सर्व घडामोडी थांबत नाहीत तोवर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यावर हेमंत रासने यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा : शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेत आरटीओकडून बदल; आता काय होणार?

त्या संदर्भात हेमंत रासने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आजवर झालेल्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील,तर १३ महिन्यांपूर्वी रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदार संघात अपघाताने आमदार झाले. त्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित आले. त्यामुळेच रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. माझा पराभव झाल्यावर मी दोन दिवसांनंतर मतदार संघातील प्रत्येक भागात जाऊन काम करीत आहे. या संपूर्ण कालावधीत रविंद्र धंगेकर यांनी केवळ फ्लेक्सबाजी करण्यावरच भर दिला आहे. मागील १३ महिन्यांच्या कालावधीत माझ्याकडे जवळपास २ हजारांहून अधिक तक्रारी आल्या. त्या सर्व तक्रारींचं निवारण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी आज एकच सांगू इच्छितो की, रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी ऑफर नागरिकांना देत रविंद्र धंगेकर यांना रासने यांनी टोला लगावला.