पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका संगणक अभियंत्याची तीन कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगणक अभियंत्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संगणक अभियंता वानवडी भागात राहायला आहेत. तक्रारदार ५३ वर्षीय संगणक अभियंत्याला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश समाजमाध्यमातून पाठविण्यात आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराचा समाजमाध्यमातील एका समुहात समावेश करण्यात आला. मोठ्या किमतीचे शेअर खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेल, तसेच शेअर खरेदीचे सर्व व्यवहार एका ॲपमध्ये दिसतील, असे त्यांना सांगण्यात आले.
गेल्या तीन महिन्यांत संगणक अभियंत्याने सायबर चोरट्यांनी दिलेल्या १९ बँक खात्यांवर वेळोवेळी तीन कोटी ७१ लाख २५ हजार रुपये जमा केले. परताव्यापोटी त्यांना सात हजार रुपये देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.