पुणे : वारजे भागातील सुकामेवा विक्री करणाऱ्या दुकानातून चोरट्यांनी सुकामेव्याची पाकिटे, तसेच रोकड असा एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. आठवड्यापूर्वी चोरट्यांनी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील असलेल्या मिठाई विक्री दुकानातून अडीच किलो आंबा बर्फी, रोकड चोरून नेली होती.

याबाबत नरेशभाई आमराभाई चौधरी (वय ३७, रा. पाॅप्युलरनगर, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांचे वारजे भागातील आरएमडी काॅलेजजवळ असलेल्या पाॅप्युलर प्रेस्टीज सोसायटीत द ड्रायफुट हाऊस हे सुकामेवा विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दुकानातील गल्ला उचकटून रोकड चोरली, तसेच दुकानातील काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीरची पाकिटे चोरट्यांनी चोरून नेली. रोकड, तसेच सुकामेवा असा एकूण मिळून चोरट्यांनी एक लाख तीन हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आंबा बर्फी आणि रोकड चोरून नेली होती. गेल्या काही महिन्यांपासून शहर परिसरात दुकानांचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे मध्यरात्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड, तसेच माल चोरून नेतात.