पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून पसार होणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून सहा मोबाइल संच आणि दुचाकी असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोहित सुरेश कांबळे (वय १८, रा. जाधवनगर, गुजरवाडी फाटा, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण एक मे रोजी आठच्या सुमारास मोबाइलवर एकाशी बोलत थांबला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे त्याच्याजवळ आले. त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केली. तरुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कांबळे याच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

गुजरवाडीत राहणारा चोरटा रोहित कांबळे आणि त्याचा साथीदाराने पादचाऱ्यांकडे पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याची गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कांबळे याला पकडले. कांबळे याच्याबरोबर असलेला साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. कांबळे याच्याकडून सहा मोबाइल संच आणि दुचाकी असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी ही कामगिरी केली.