पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हे नाव आणि ‘पक्ष चिन्ह’ अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचा नामफलक तोडला होता. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत वैयक्तिक लक्ष घालावे, असे साकडे खुद्द शरद पवार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समक्ष भेट घेत घातले. पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली.त्यावेळी प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन तक्रार केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला. त्यानंतर पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर काळया फिती बांधुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. “गली गली मे शोर है अजित पवार चोर है, जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा”, अशा घोषणा दिल्या. तर पक्ष कार्यालयाबाहेर असलेल्या कोनशिलेवरील अजित पवार यांचे नाव हातोडी मारून फोडण्यात आले.

हेही वाचा : ‘आधी पक्षसंघटन मग मुख्यमंत्री पद’, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले!

या घटनेनंतर अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी प्रशांत जगताप यांना जाब विचारला, त्यामुळे काही काळ पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पक्ष कार्यालय परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीनंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. तर आज शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना सभेच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवणार्‍या कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी शिवाजीनगर येथील निवासस्थानी घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी एकूणच सर्व घटनाक्रम सांगितला. त्याचवेळी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन झाल्यानंतर एक व्यक्ती मला घरी भेटण्यास आला.

हेही वाचा : पुणे : मृत बिबट्याच्या अवयवांची चोरी, वन विभागाकडून गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यांनी अजितदादांच्या नावाची पाटी फोडली आणि विरोधात घोषणाबाजी केली, त्या आंदोलनकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो. याबाबत मला त्या व्यक्तीने माहिती दिली. पण या सर्व मुलांनी केलेल्या कृत्याबद्दल माफी देखील मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. ही सर्व मुले २५ ते २८ वयोगटातील आहे. या सर्वांच्या जिवाला काही होऊ नये. त्यामुळे या प्रकरणी दादांनी लक्ष घालावं आणि दादांनी मोठेपणा दाखवावा, असं गार्‍हाणं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या समोर मांडलं. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या.