लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या विविध सोई-सुविधा मिळण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अर्जांच्या रकान्यामध्ये आता तृतीयपंथीयांनाही स्थान देण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व अर्ज, आवेदनपत्रांवर लिंग या प्रकारासमोर स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असे तीन रकाने उपलब्ध असणार आहेत.

तृतीयपंथी व्यक्तींना महापालिकेच्या विविध सोई-सुविधा देताना तसेच, लाभ देताना कागदोपत्री अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेतर्फे स्वीकारले जाणारे किंवा मागविले जाणारे अर्ज व आवेदनपत्र भरताना त्यावर लिंग या रकान्यासमोर स्त्री आणि पुरुष असे दोनच पर्याय असतात. तेथे तृतीयपंथी असा पर्याय उपलब्ध नसल्याने ते सोई-सुविधांपासून वंचित राहतात.

आणखी वाचा-पुण्यात पुन्हा ‘कोयत्या’ची दहशत; पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हे सुरूच

तृतीयपंथी हा समाजाचा घटक आहे. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा आणि महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मूलमूत अधिकार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागांकडून अर्ज मागविताना त्या अर्जावर स्त्री, पुरुष तसेच, तृतीयपंथी असा रकाना उपलब्ध करून द्यावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. यापुढे महापालिकेच्या सर्व अर्ज व आवेदनपत्रांवर लिंग या प्रकारासमोर स्त्री, पुरुष व तृतीयपंथी असे तीन पर्यायी रकाने उपलब्ध असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरीची संधी

महापालिकेने वारसा हक्कानुसार अनुकंपा तत्वावर सफाई कामगार म्हणून एका तृतीयपंथीयास कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. तर सुरक्षा, उद्यान विभागात कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक म्हणून नेमले आहेत.