वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे वसंत व्याख्यानमालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचे मंगळवारी (२१ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहामध्ये महिनाभर दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या ज्ञानसत्राचा २० मे रोजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
‘दहशतवादाच्या छायेत धर्मनिरपेक्षता’ या विषयावर ४ मे रोजी होणाऱ्या चर्चासत्रात शरद कुंटे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी आणि अॅड नितीन आपटे, तर ‘आजचे नाटक आणि प्रयोगशीलता’ या विषयावरील चर्चासत्रात धर्मकीर्ती सुमंत, निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांचा सहभाग आहे. ‘अच्छे दिन केव्हा’ या विषयावर १५ मे रोजी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे, तर ‘पुणे मेट्रो’ या विषयावर ९ मे रोजी अरुण फिरोदिया यांचे व्याख्यान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते-लेखक डॉ. अनिल अवचट, मुक्ता पुणतांबेकर यांच्या दिलखुलास गप्पा, संगीतकार कौशल इनामदार आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत होणार आहे. ‘महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र’ या विषयावर निनाद बेडेकर, ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर विनय सहस्रबुद्धे, ‘तळागाळातील राजकारण’ या विषयावर आमदार बच्चू कडू, ‘भारताची अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर राजन खान यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि प्रमुख कार्यवाह मंदार बेडेकर यांनी शनिवारी दिली. या मालिकेत अभय टिळक (संत तुकाराम), रवि पंडित (औद्योगिकरण आणि रोजगारनिर्मिती), डॉ. माधव गाडगीळ (केवळ माझा सहय़कडा), डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे (मिशन मेळघाट) यांचीही व्याख्याने होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2015 रोजी प्रकाशित
वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे वसंत व्याख्यानमालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचे मंगळवारी (२१ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

First published on: 19-04-2015 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of vasant vyakhyanmala by cm devendra fadnavis