समाजात प्रत्येकाच्या मनामध्ये जात खोलवर रुजली आहे. आज इतर मागासवर्गीयात तसेच शुद्रातिशुद्र समजल्या गेलेल्या वेगवेगळ्या जातींमध्येही जातव्यवस्थेची उतरंड पाहायला मिळते. त्यामुळे जातव्यवस्था उलथून टाकण्याची जबाबदारी केवळ उच्चवर्णीयांचीच नाही, तर इतर जाती जमातींचीही तितकीच आहे, असे मत सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले. मागासवर्गीय राजकीय नेते, प्रस्थापित साहित्यिक, कलावंत आणि सामान्य मागासवर्गीय माणूस यांच्या वर्णीय नसली, तरी वर्गीय दरी निर्माण झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका रमनिका गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात नीरजा बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, लेखक व दिग्दर्शक संजय पवार, पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक विजय खरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर त्या वेळी उपस्थित होते.
नीरजा म्हणाल्या, जातीव्यवस्थेला हादरा देण्याचे, ती संपविण्याचे काम फुले, आंबेडकरांनी गेल्या शतकात केले. पण, आजही ही जातव्यवस्था खऱ्या अर्थाने हालली, असे म्हणता येणार नाही. आजच्या आधुनिक युगात पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांच्या मनातून जात गेली नाही. जातव्यास्था बळकट होते आहे. मागास समजल्या गेलेल्या जातींमध्येही जातव्यवस्थेची उतरंड आहे. उच्चनिचतेचा भाव ठेवणाऱ्या प्रत्येकाला स्वत:चे वर्चस्व स्थापित करायचे असते. सत्तेचा उपभोग घ्यायचा असतो. सत्ता मिळत नाही तोवर आपण शोषित असतो, पण ती मिळाली की आपण शोषक होतो.
लेखनाविषयी त्या म्हणाल्या की, लेखकाला स्वत:ची एक जीवनदृष्टी असायला हवी. ही जीवनदृष्टी एखाद्या वादावर किंवा राजकीय भूमिकेवर आधारित असण्यापेक्षा मानवकेंद्री असावी. लेखकाला ‘स्व’कडून ‘सार्वत्रिका’कडे प्रवास करणे गरजेचे आहे. असा प्रवास करण्यासाठी जगणे समजून घेतले पाहिजे.
स्त्री चळवळीबाबत त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांच्या प्रश्नांकडे जास्त गांभीर्याने पाहिले गेले. जाचक रुढी, परंपरातून सुटका मिळाली असली, तरी स्त्री या जंजाळात आजही अडकून पडली आहे. व्यवस्थेने तिला दिलेले दुय्यम स्थान आजही तसेच आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुष होणे, या भ्रामक कल्पनेने या गंभीर चळवळीकडे विनोदाचा विषय म्हणून पाहिले गेले. जातीअंताच्या चळवळीकडे पाहिले तशा गंभीरपणे या चळवळीकडे पाहिले गेले नाही.
गुप्ता म्हणाल्या की, डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपण पुढे घेऊन जातोय का, याचा विचार केला पाहिजे. डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांचे नव्हे, तर जगाचे नेते होते. सामाजिक व सांस्कृतिक बदलांचा त्यांचा विचार होता. हा परिवर्तनवादाचा विचार तळागळापर्यंत नेला पाहिजे. त्यांनी दिलेली एक चांगली घटना आज चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने देशात सामान्य माणसाचे हाल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration sammyak sahitya sammelan
First published on: 14-12-2013 at 02:47 IST