पीएमपीतर्फे चालवल्या जाणाऱ्या पुणे दर्शन फेरीमध्ये येरवडा येथे विकसित करण्यात आलेल्या लुंबिनी पार्कचाही समावेश करण्यात आला असून या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ बुद्धजयंतीचे औचित्य साधून शनिवारी (२५ मे) महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते केला जाणार आहे.
आरपीआयचे महापालिकेतील गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पुणे दर्शन या फेरीमध्ये लुंबिनी पार्कचा समावेश करावा असा निर्णय महापालिकेच्या सभेत यापूर्वीच झाला असून त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होत असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येथे सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त त्याच दिवशी सकाळी सहा ते नऊ या वेळेत गायक रवींद्र साठे हे ‘धम्म पहाट’ हा गीतगायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक ४ मध्ये लुंबिनी उद्यान विकसित करण्यात आले आहे. तथागत गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला अभिप्रेत असे हे उद्यान असून उद्यानात गौतम बुद्धांचे जीवनचरित्र शिल्पांच्या रूपाने साकारण्यात आले आहे. महापालिकेने विकसित केलेले हे एक सुंदर स्थळ असून त्याचे दर्शन पुणे शहर पाहायला येणाऱ्या हजारो पर्यटकांना यापुढे होईल, असे डॉ. धेंडे म्हणाले. महापालिकेने हे उद्यान प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही घोषित केले आहे.