आयुष्याच्या अखेरीस निवांतपणा अनुभवण्यासाठी त्यांनी सर्व सोयींनी सज्ज वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.. त्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मोजले.. वृद्धाश्रमाच्या जाहिरातींमध्ये अनेक गोष्टी कबूल करण्यात आल्या होत्या.. प्रत्यक्षात तेथे राहायला गेल्यावर अनेक गोष्टी अपूर्ण होत्या.. एकेक गोष्ट पूर्ण केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.. पण कितीतरी काळ लोटला तरी सोयी झाल्याच नाहीत.. उलट यायचा जायचा रस्ता बंद झाला, आजारपणासाठी ना डॉक्टर-ना आया.. तरीही बाहेर पडता येत नाही, कारण अडकलेले पैसे!
पुण्यापासून साताऱ्याकडे जाताना काही अंतरावर खेड-शिवापूर हे गाव. त्याच्याजवळ असलेल्या वृद्धाश्रमातील मंडळींना हा त्रास सहन करावा लागत आहे. पण पैसे सोडून तेथून बाहेर पडायचे तर जगायचे कसे, या विवंचनेमुळे त्या गैरसोयीतही ते दिवस काढत आहेत.. संचालकांना मात्र त्यांची फिकीर नाही, तिथे काही सुधारणाही होत नाहीत.
हा वृद्धाश्रम सर्व सोयींनी युक्त असेल अशी जाहिरात देण्यात आली होती. डॉक्टर्स, नर्सेस, आया, काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित लोक असे बरेच काही सांगण्यात आले होते. हे ठिकाण म्हणजे पुण्याच्या गोंगाटापासून दूर, तरीही पुण्यापासून जवळ असे असल्याने अनेकांनी त्याला पसंती दिली. त्यासाठी वीस लाख रुपयांची रक्कम भरून प्रवेश घेतला. अनेकांनी हाताशी असलेली साधने विकून पैशांची व्यवस्था केली, काहींनी आयुष्यभराची पुंजी लावली. अनेकांनी एक छान स्वप्न घेऊन तेथे प्रवेश केला.. पण लवकरच नव्याचे नऊ दिवस संपले. आता त्या ठिकाणी गैरसोयी आणि त्रासामुळे सर्वजण कंटाळले आहेत.
वृद्धाश्रम म्हटल्यावर सर्वच वयस्कर. त्यापैकी एक जण तर ९२ वर्षे वयाचे आहेत. तरीही तिथे स्वच्छतेची पुरेशी व्यवस्था नाही. या वयात कोणी अचानक आजारी पडले तर डॉक्टरांची, नर्सेसची व्यवस्था नाही. संचालक तिकडे फिरकत नाहीत. सारी भिस्त आहे ती तिथे काम करणारे दोन आचारी आणि रखवालदारांवर! बाहेर पडायचे म्हटले तर आत जाणारा रस्ता कच्चा, शेतातून जाणारा. त्याबाबत वाद असल्याने रस्त्यात मोठाले चर खणून ठेवले जातात. त्यामुळे मोटार तर सोडाच, पण मोटारसायकलसुद्धा प्रवेश करू शकत नाही. आतून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे सर्व जण जणू बंदीच बनले आहेत. विशेष म्हणजे याबाबत बोलायचीही चोरी. कारण कुठे तक्रार केली तर अडकलेले पैसे बुडण्याची भीती. त्यामुळे स्वत:चे नाव जाहीर न करता तेथील लोक गाऱ्हाणे मांडत आहेत.. काहींनी ती जागा सोडून इतरत्र आसरा घेतला आहे, पण सर्वानाच ते शक्य नाही. त्यांना प्रतीक्षा आहे ती कोणीतरी यातून बाहेर काढेल याची! पण सोबत एक चिंताही आहे, हे सारं करणार कोण..?