पुणे : कला संचालनालयाच्या अखत्यारितील कला महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदविका, पदवीच्या शिक्षकांना आता सैद्धांतिक तासिकेसाठी ६२५ रुपये आणि प्रात्यक्षिकासाठी ३०० रुपये, तज्ज्ञ मार्गदर्शकांना ७५० रुपये, पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना सैद्धांतिक तासिकेसाठी ६२५ आणि प्रात्यक्षिकासाठी २५० रुपये मानधन दिले जाईल.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत पदवी आणि पदव्युत्तर पदविका, पदवीच्या शिक्षकांना सैद्धांतिक तासिकेसाठी ३०० रुपये आणि प्रात्यक्षिकासाठी १५० रुपये, पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना सैद्धांतिक तासिकेसाठी २५० रुपये आणि प्रात्यक्षिकासाठी १२५ रुपये, तज्ज्ञ मार्गदर्शकांना सैद्धांतिक तासिकेसाठी ३०० रुपये मानधन दिले जात होते.
मानधनामध्ये वाढ करताना काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत. त्यात सर्व शिक्षकीय आणि प्रशासकीय पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणकानुसार शैक्षणिक भार देण्यात आल्याची खात्री महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्यानी करावी. तासिका तत्त्वावरील शिक्षकाला एकाच महिन्यात त्याच्या दर्जाच्या लागू वेतनश्रेणीतील सुरुवातीच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक मानधन दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करताना त्यांची बॅक डोअर नियुक्तीची परिस्थिती उद्भवेल अशा उमेदवारांना निमंत्रित करू नये, कला संचालकांच्या मान्यतेने जाहिरात देऊन स्थानिक निवड समितीमार्फत शिक्षकांची निवड करावी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची एका शैक्षणिक वर्षांत नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येईल, एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी दोनच तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नियुक्ती करता येईल. एका शिक्षकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा कार्यभार सोपवता येईल. महाविद्यालयात पूर्णवेळ कार्यरत शिक्षकांना तासिका तत्त्वावर अतिरिक्त नियुक्ती देऊ नये.
प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि तासिका तत्त्वावर प्रदान मानधन या बाबत अनियमितता आढळल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता याची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हमीपत्र घेऊनच नियुक्ती
तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नियुक्ती तात्पुरती असल्याने त्यांना नियमित सेवेचे लाभ कोणतेही हक्क मिळत नाहीत. त्यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांकडून भविष्यात कायम करण्याची मागणी करणार नाही आणि नियमित सेवेच्या हक्काची मागणी करणार नाही या बाबतचे हमीपत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लेखी घ्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.