पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात हिरवी मिरची वगळता बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर राहिले. हिरवी मिरचीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (५ फेब्रुवारी) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात फळभाज्यांची आवक १०० ते ११० ट्रक होती. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ५ ते ६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून मिळून २४ ते २५ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो पावटा, बंगळुरूतून २ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ९ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक : भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी प्रचारास केली सुरुवात, ‘आर.आर.एस’च्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट

पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक अशी आवक झाली.

पालेभाज्या स्वस्त

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांच्या दरात घट झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडींची आवक झाली. मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात मुळा, कोथिंबिरीच्या जुडीमागे ५ रुपयांनी घट झाली. कांदापातीच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली. मेथी, शेपू, चाकवत, अंबाडीच्या जुडीच्या दरात १ रुपयांनी घट झाली.

बोरे, पेरू, खरबूजच्या दरात घट

मार्केट यार्डातील फळबाजारात बोरे, पेरू, खरबूजच्या दरात घट झाली असून, बोरांच्या दरात वाढ झाली आहे. बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आवक कमी झाली आहे. बोरांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे पेरूला मागणी कमी असून, पेरूच्या दरात १० टक्क्यांनी घट झाली आहे. फळबाजारात लिंबू २ ते अडीच हजार गोणी, अननस ६ ट्रक, डाळिंब २५ टन, मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री २० ते २५ टन, बोरे १५० गोणी, चिकू १ गोणी, खरबूज १० ते १५ टेम्पो, पपई १० ते १५ टेम्पो, सफरचंद २ ते अडीच हजार पेटी, किन्नू ४ ते ५ हजार खोकी अशी आवक झाली.

हेही वाचा – पुणे : शाळकरी मुलीचा विनयभंग, क्रीडा शिक्षक अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासळी तेजीत

मासळीला चांगली मागणी असून दर तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत इंग्लिश अंड्यांची आवक वाढली असून शेकड्यामागे इंग्लिश अंड्याच्या दरात ५० रुपयांनी घट झाल्याची माहिती चिकन, अंडी व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीतील मासळी १५० ते २०० किलो, नदीतील मासळी २०० ते ३०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची १५ ते २० टन आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.