२ लाख २७ हजार ९५० प्रवाशांचा प्रवास; रविवारी विक्रमी ६७ हजार ३५० नागरिकांना सेवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर आठवडाभरात या दोन्ही मार्गिकांवरून एकूण २ लाख २७ हजार ९५० प्रवाशांनी प्रवास केला आहे. सात दिवसांत सरासरी ३४ हजार २४३ नागरिकांनी प्रतिदिन प्रवास केला असून त्याद्वारे सरासरी ४ लाख ५ हजार ७०९ एवढे उत्पन्न महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला प्राप्त झाले आहे. दरम्यान, दिवसाची विक्रमी प्रवासी संख्या ६७ हजार ३५० एवढी रविवारी (१३ मार्च) नोंदविण्यात आली.

वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर अंतरामध्ये आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी या सात किलोमीटर अंतरामध्ये मेट्रोची प्रवासी सेवा सहा मार्च रोजी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रवासी सेवेला प्रारंभ झाला. मेट्रोचे उद्घाटन होताच रविवारी दुपारी दोन वाजल्यापासूनच मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवासांची झुंबड उडाली. सेवेच्या पहिल्याच दिवशी ३७ हजार ७५२ नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला.

ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, युवक, कामगार, कुटुंबे, विविध प्रकारचे गट मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुढे येत आहेत. मेट्रो प्रवासातील छायाचित्रे, सेल्फी आणि समाजमाध्यमातून मेट्रो प्रवासाबाबतच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. परिसरातील काही शाळाही विद्यार्थ्यांची मेट्रो सफारी आयोजित करत आहेत.

मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर (६ ते १३ मार्च) या कालावधीत २ लाख २७ हजार ९५० प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. एकाच दिवसाची विक्रमी लोकसंख्या रविवारी ६७ हजार ३५० एवढी नोंदविण्यात आली. या एकाच दिवशी मेट्रोला १० लाख ७ हजार ९४० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सात दिवसांचा विचार केल्यास सरासरी ३४ हजार २४३ नागरिकांनी दर दिवसाला मेट्रोतून प्रवास केला असून सरासरी ४ लाख ५ हजार ७०९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

तिकिटीसाठी मोबाईल अ‍ॅप

प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून ऑनलाइन तिकीट व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत २६ हजार ७४२ नागरिकांनी ही यंत्रणा मोबाईलमध्ये कार्यान्वित केली आहे. मोबाईलच्या माध्यमातूनच तिकीट काढण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोने सरकते जिने, उदवाहक, तिकीट खिडकी येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing response metro travel passengers service record citizens sunday ysh
First published on: 15-03-2022 at 01:47 IST