पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून आंब्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी दीडपटीने वाढ होऊन २३ जूनअखेर ९७४.८९ टन आंब्यांची निर्यात झाली आहे. सर्वाधिक ८०६ टन इतकी निर्यात अमेरिकेला झाली आहे.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात क्षकिरण प्रक्रिया करून जपानला ४१.६४ टन, न्यूझीलंडला ८६.२६ टन, दक्षिण कोरियाला ३.८८ टन, मलेशियाला ०.४६ टन, ऑस्ट्रेलियाला २७.२९ टन, युरोपीयन देशांना ८.६० टन आणि अमेरिकेला सर्वाधिक ८०६ टन इतकी निर्यात झाली आहे. मागील वर्षी ५७६ टन निर्यात झाली होती, यंदा २३ जूनअखेर ९७४.८९ इतकी निर्यात झाली आहे.
देशातून हापूस, केशर, बैगनपल्ली (बदामी) आंब्याची निर्यात होते. यंदा हापूस, केशर, बदामी आंबे आठ एप्रिल रोजी जपानला आणि अकरा एप्रिल रोजी अमेरिकेला पाठविण्यात आले.
अमेरिका, दक्षिण कोरियाची निर्यात बंद
अमेरिका आणि दक्षिण कोरियाला होणारी निर्यात आता बंद झाली आहे. या दोन्ही देशांचे निरीक्षक पथक मायदेशी रवाना झाले आहे. वाशी येथून दक्षिण कोरियाला यंदा प्रथमच आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. आता राज्यातून जुन्नर परिसरात उत्पादित होणाऱ्या आंब्यांची निर्यात सुरू आहे. त्या शिवाय दक्षिण आणि उत्तर भारतात उत्पादित होणाऱ्या आंब्याची निर्यात सुरू आहे.
आणखी वाढ होण्याची शक्यता
यंदा कोकणात हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. निर्यातक्षम उत्पादनही घटले होते, त्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण, हापूसची कसर हापूस, केशर, बैगनपल्ली (बदामी) आंब्यांनी भरुन काढली. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी दीडपट वाढ होऊन यंदा २३ जूनअखेर ९७४.८९ टन आंब्याची निर्यात झाली आहे. दक्षिण आणि उत्तर भारतातील आंब्याची निर्यात अजूनही सुरूच आहे, त्यामुळे निर्यातीच्या आकडय़ात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
पणन मंडळाच्या वतीने वाशी येथे अत्याधुनिक निर्यात केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. देशभरातील आंब्याची येथून निर्यात होते. वाशी बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे आलेल्या आंब्यातून दर्जेदार आंबे निवडून निर्यात करीत असल्यामुळे निर्यात सतत वाढत आहे. थेट शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून फारशी निर्यात होताना दिसत नाही.
– मिलिंद जोशी, उपसरव्यस्थापक, पणन मंडळ