पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

चाकण परिसरात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाकण परिसरातील महावितरणच्या सर्व यंत्रणेवर अतिताण येत असून, त्यामुळे विजेची टंचाई निर्माण झाली आहे. याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे आणि कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उद्योगांमधील यंत्रांना फटका बसत आहे आणि त्यांचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. ही यंत्रे देखभाल व दुरुस्तीसाठी वारंवार बंद ठेवावी लागत असल्याने उत्पादनाला फटका बसत आहे. यामुळे कच्चा मालही वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर चाकणमधील उद्योगांना भेडसावत असलेला हा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी दिलीप बटवाल आणि विनोद जैन यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा (आयएएस) यांची भेट घेतली. उद्योगांकडून महावितरणला पायाभूत यंत्रणा उभारण्यासाठी, स्विचिंग स्टेशन, पॉवर स्टेशन यासाठी स्वखर्चाने जागा देतात. तसेच, उद्योग फिडरसाठी लाखो रुपये खर्च करतात. तरीही उद्योगांना महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही, ही बाब उद्योगांच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आली.

वर्षभरात सुधारणा करण्याचे आश्वासन

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रा यांनी उद्योगांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, येत्या वर्षभरात आम्ही मोठ्या प्रमाणावर या परिसरातील महावितरणची यंत्रणा सक्षम करणार आहोत. त्यामुळे पुढील वर्षी वीजपुरवठ्याबाबत उद्योगांच्या तक्रारी राहणार नाहीत. यापुढील काळात उद्योगांना अखंडित वीजपुरवठा केला जाईल. वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.

चाकण औद्योगिक क्षेत्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या परिसरातील महावितरणच्या यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्यामुळे हे घडत आहे. विजेच्या समस्यांमुळे उद्योगांना मोठा फटका बसत आहे. उद्योगांच्या उत्पादनात घट होण्यासोबत आर्थिक झळही सोसावी लागत आहे. – दिलीप बटवाल, मुख्याधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

विजेचा दाब वाढविण्याची गरज असेल तिथे तो तातडीने वाढवून देण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना केल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्यामागे अंतर्गत बिघाड हेही एक कारण आहे. एखाद्या उद्योगाच्या अंतर्गत बिघाडामुळे त्या फिडरवरील इतर ग्राहकांनाही खंडित विजेचा फटका बसतो. त्यामुळे उद्योगांनीही ‘लोड ब्रेक स्वीच’चा वापर करावा. हे स्वीच बसविल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या ५० टक्के कमी होईल. – लोकेश चंद्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण