पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अशातच पुण्यातील प्रतिष्ठित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गोखले संस्थेतील अकादमिक ब्लाक या इमारतीमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार करण्यात आली आहे. त्यात स्वाक्षरी फलक लावण्यात आला आहे. मतदार जागृती करण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग आहे. या फलकावर गोखले संस्थेसह निवडणूक आयोग, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग अशा संस्थांची बोधचिन्हे आहेत. मात्र या फलकावर नोटा, इन्कलाब जिंदाबाद लिहिण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. हा प्रकार कोणी आणि का केला या बाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने संस्थेत जाऊन पाहणी केली.
हेही वाचा – राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय
फलकाची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी केली. तसेच आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण गोखले संस्थेच्या प्रशासनाकडून देण्यात आले आहे.