राज्यातील मागील सरकारच्या काळात बालचित्रवाणी ही स्वतंत्र असलेली संस्था बंद करण्यात आली. बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याची चौकशी करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी मंगळवारी जाहीर केले.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील माहिती गायकवाड यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. त्यात गायकवाड बोलत होत्या.
विनोद तावडे शालेय शिक्षणमंत्री असताना बालचित्रवाणी ही स्वतंत्र संस्था बंद करण्यात आली. करोना विषाणू संसर्गाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी बालचित्रवाणी उपयुक्त ठरू शकण्याबाबत गायकवाड यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाल्या, की बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला याची चौकशी करण्यात येईल. राज्य शासनाकडून शिक्षणासाठी स्वतंत्र वाहिनी सुरू केली जाणार आहे. त्याचा प्रस्तावही टाळेबंदीपूर्वी केंद्राला पाठवण्यात आला होता. मात्र अद्याप त्याला केंद्राकडून मान्यता मिळालेली नाही.
राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. त्याबाबतचे अधिकार स्थानिक पातळीवरील प्रशासनाला देण्यात आले आहेत. पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची क्षमता, आरोग्याचा विचार करून त्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार नाही. दूरदर्शनवर वेळ मिळाल्यास या विद्यार्थ्यांना तेथील शैक्षणिक कार्यक्रम दाखवता येतील. असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
लाल श्रेणीत असलेल्या भागातील शाळांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण विभागाने तयार केली आहेत. शासनाची मान्यता घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
दहावी, बारावीचा निकाल जुलैमध्ये?
करोना संसर्गामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत उशिरा जाहीर होईल. सध्या उत्तरपत्रिकांचे संकलन, तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करून १५ ते ३० जुलै दरम्यान दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असे गायकवाड म्हणाल्या.