अपघातग्रस्त मोटारीचा चुकीच्या कारणामुळे विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. मोटारीचे नुकसान झाल्यामुळे त्याची भरपाई म्हणून एक लाख ३६ हजार रुपये आणि शारीरिक व माननिक नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च असे एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य गीता घाटगे यांनी दिला.
प्रशांत रंगनाथ बेंजरपे (रा. विष्णुपुरी, बॉम्बे पार्कजवळ, सोलापूर) यांनी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे पुण्यातील विभागीय व्यवस्थापक तर मुंबई येथील मुख्य व्यवस्थापक यांच्या विरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. प्रशांत हे सुशिक्षित बेकार असल्यामुळे त्यांनी व्यवसायासाठी टाटा इंडिका मोटार विकत घेतली होती. त्या मोटारीचा विमा न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडून उतरविला होता. २७ मार्च २००९ रोजी बेलापूरकडून डोंबिवली येथे जात असताना त्यांच्या मोटारीला समोरून येणाऱ्या चारचाकी मोटारीने धडक दिली. यामध्ये त्यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत त्यांनी नवी मुंबई येथील तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अपघाताचा घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला होता. त्यानंतर प्रशांत यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सुद्धा जोडली होती. कंपनीने कागदपत्राची शहानिशा न करताच विमा नामंजूर केला. पोलिसांनी पंचनाम्यामध्ये मोटारीचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे नमूद केले होते. त्यामुळे मोटारीचे एक लाख ८० हजार रुपये मिळावे म्हणून प्रशांत यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. विमा कंपनीने म्हणणे मांडताना तक्रारदारांकडे मागणी करूनही त्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे विमा नामंजूर केल्याचे सांगितले.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि मंचासमोर आलेली कागदपत्रे पाहिल्यानंतर विमा कंपनीने सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे मंचाला दिसून आले. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी करीत असताना सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर पोलिसांनी दिलेल्या पंचनाम्यावरून मोटारीचे पूर्ण नुकसान झाल्याचे सिद्ध होत आहे. तक्रारदार यांनी पूर्वीच कागदपत्रे दाखल केलेली असताना विम्याची रक्कम नाकारण्यासाठी कंपनीने दिलेली कारणे पुरेशी नाहीत. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात, असे मंचाने आदेशात म्हटले आहे.