सहकारी पतसंस्थांना आता बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाच्या पुणे खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे सर्व सहकारी पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील २३ पतसंस्थांनी सन २०१७-१८ चे प्राप्तिकर विवरणपत्र भरताना गुंतवणुकीवरील व्याजावर प्राप्तिकरातून सूट मागितली होती.

हेही वाचा >>> उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण धोकादायक पातळीवर

प्राप्तिकर कायदा कलम ८०-पी अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांमधील गुंतवणुकीवर व्याज करमुक्त आहे. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांनी ‘शासनाचा महसूल बुडवला जातोय’, असे सांगत पतसंस्थांनी गुंतवणुकीवरील व्याजावर कर भरलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यासाठी त्यांनी प्राप्तिकर कलम २६३ चा दाखला दिला होता. या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध पतसंस्थांनी पुणे खंडपीठाकडे दाद मागितली होती. खंडपीठाच्या या निर्णयामुळे इतर पतसंस्थांना देखील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून सूट मिळवता येईल. याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे म्हणाले, की पुणे खंडपीठाच्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी पतसंस्था राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरून व्याजावर कर सवलत घेण्यास पात्र आहेत.

हेही वाचा >>> पुण्यातील स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतचे निकालपत्र पतसंस्थांना फेडरेशनच्या कार्यालयातून घेता येईल. मात्र, अद्यापही प्राप्तिकर विरोधातला लढा संपलेला नाही. पतसंस्थांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफी मिळाली पाहिजे, ही मागणी कायम आहे. भादंवि १९४ प्रमाणे एक कोटी रुपयांच्या पुढे रक्कम बँकेतून काढल्यास त्यावर एक-दोन टक्के उत्पन्न स्त्रोतावरील कर (टीडीएस) कापला जातो. मात्र, पतसंस्थांना प्राप्तिकर माफी असेल, तर टीडीएस कापण्याचे कारणच काय? यावरही आमचा लढा चालूच राहील. याबाबत फेडरेशन सनदी लेखापाल किशोर फडके यांच्या माध्यमातून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) दाद मागणार आहे.