प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहरा बदलून आलिशान जीवन जगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. बँका व पतपेढय़ा फोडण्यात हातखंडा असलेल्या टोळीचा हा म्होरक्या आहे. १९९१ पासून या गुन्हेगाराने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये विविध ठिकाणी बँका व पतपेढय़ा फोडल्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
सुरेश काशिनाथ उमक (वय ४८, मूळ रा. कमळापूर, ता मोर्शी, जि. अमरावती) असे बँका व पतपेढय़ा फोडणाऱ्या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. प्रमोद अंबादास उमक (वय ३६), किशोर भाऊराव सुरोडकर (वय २८, रा. औरंगाबाद), विशाल बाळू क्षीरसागर (वय १९) यांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व विजयकुमार मगर यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेजवळील गंगाधर शितोळे यांच्या उसाच्या शेतीत १३ जुलैला काही संशयास्पद वस्तू मिळाल्या. शितोळे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री या भागात सापळा लावला. १४ जुलैला पहाटे तीनच्या सुमारास बँकेसमोर एका मोटारीतून काही व्यक्ती आल्या. त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पळून जाणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडण्यात आले. मात्र, सुरेश उमक त्या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला.
पळून गेलेल्या उमकला पकडण्यासाठी अमरावती, औरंगाबाद व नागपूर येथे पथके पाठविण्यात आली. उमक हा नागपूर येथील एका लॉजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकून त्याला पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, कर्मचारी जनार्धन शेळके, सहदेव ढुबे, राजू मोमीम, कल्पेश राखोंडे, सोमनाथ वाफगावकर आदींनी ही कारवाई केली.
प्लास्टिक सर्जरी अन् आलिशान जीवन
सुरेश उमक याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर तो बराच काळ फरार झाला होता. या काळात त्याने ओळख लपविण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलला होता. औरंगाबादमधील देवळाई भागात त्याने आलिशान रो हाउस घेतले होते. मुख्य म्हणजे या ठिकाणी तो ओम ऊर्फ सागर रावसाहेब देशमुख या नावाने राहत होता. या भागात त्याने चांगली प्रतिमा निर्माण केली होती. मिळकतकर अधिकारी, डॉक्टर, रस्ते कंत्राटदार अशी ओळख तो लोकांना सांगत होता.
 अशा फोडल्या बँका, पतपेढय़ा
बँका व पतपेढय़ा फोडण्यासाठी सुरेश उमक हा त्या-त्या भागातील गरजू मुलांना हाताशी धरत होता. राज्यातील वेगवेगळ्या भागाची टेहाळणी तो सातत्याने करीत असे. रस्त्यांचा नकाशा पाहून काहीशा निर्जन भागात असलेल्या बँका व पतपेढय़ांची तो निवड करीत होता. गॅस कटर, ड्रील मशिन, पहार, कुऱ्हाड अशा वस्तूंच्या वापरातून अध्र्या तासांतच बँकांची तिजोरी साफ केली जात होती. उमक याचा इलेट्रॉनिकमध्ये डिप्लोमा झालेला आहे. त्यामुळे काही यंत्रणांची त्याचा चांगलीच माहिती आहे. त्यातूनच बँका किंवा पतपेढय़ांचा सायरन वाजू न देण्याची व्यवस्था तो करीत होता. अशाच पद्धतीने त्याने राज्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी, बीड, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रायगड, अमरावती आदी जिल्ह्य़ांमध्ये गुन्हे केले आहेत.
विवाहासाठी बनवाबनवी
उमक याला एका मुलीशी विवाह करायचा होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. त्यानंतर उमक याने सागर देशमुख या नावाने एक व्यक्ती मुलीच्या घरी पाठविली. काही दिवसांनंतर त्या व्यक्तीशी विवाह करण्यास मुलीच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली. हा विवाह झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला बाजूला करून सागर देशमुख हे नाव धारण करून उमक हा तिच्यासोबत राहू लागल्याचाही प्रकार तपासात उघड झाला आहे.