|| विवेक खटावकर

‘सकल कलांना वंदनीय’ असलेल्या गणेशोत्सवामध्ये विविध गणेश मंडळांचे देखावे पाहताना गणेशभक्त देहभान हरपून जातात. देशाच्या विविध प्रांतातील वैशिष्टय़पूर्ण मंदिरे आणि महाल अशा वास्तूंची हुबेहूब प्रतिकृती साकारणाऱ्या कसबी कलाकारांना या देखाव्याच्या माध्यमातून पसंतीची पावती मिळते. ‘समृद्ध कलेचा उत्सव’ असलेल्या गणेशोत्सवामध्ये काम केल्यामुळे कलाकार आणि माणूस म्हणूनही आम्ही समृद्ध होतो, अशी भावना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसाठी देखावा साकारणारे विवेक खटावकर आणि छत्रपती राजाराम मंडळासाठी मंदिरांची उभारणी करणारे अमन विधाते यांनी व्यक्त केली. या कलाकारांशी साधलेला संवाद.

     गणेशोत्सवामध्ये भव्य प्रतिकृती साकारण्याच्या क्षेत्राकडे कसे वळलात?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी मला सजावटीचे काम करण्यास सांगितले तेव्हा मला ते आव्हान वाटले. याचे कारण मी प्लॅस्टर ऑफ पॅरीस, फायबर ग्लास या माध्यमांमध्ये शिल्पकला करणारा कलाकार आहे. लाकूड आणि प्लायवूड या माध्यमांशी माझा कधीच संबंध आलेला नव्हता. पण, मी शिकत गेलो आणि हे माध्यम आत्मसात केले. गणरायाच्या आशीर्वादाने माझ्याकडून गेली अकरा वर्षे देखाव्याचे काम झाले.

 

कलाकृती साकारताना शिक्षणाचा उपयोग कसा झाला?

अभिनव कला महाविद्यालयातून कला शिक्षण घेतल्यानंतर मी वडिलांच्या म्हणजे डी. एस. खटावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. त्याचबरोबरीने मी डेक्कन कॉलेजमधून पुरातत्त्वशास्त्र विषयात एम. ए. पदवी संपादन केली. त्यामुळे माझ्या कलात्मक शिक्षणाला ज्ञानाची जोड मिळाली. या अभ्यासामुळे पाश्र्वभूमी, इतिहास समजला आणि त्याला वास्तवाशी संदर्भ जोडून कलाकृती साकारण्याला बळ लाभले. मुद्गल पुराणामध्ये केलेल्या वर्णनानुसार सजावट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या कलात्मकतेला आध्यात्मिकतेचे अधिष्ठान लाभते. वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती साकारल्यानंतर या क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर देता आले पाहिजे ही जाण आली. गेल्या चार दशकांपासून मी गणेशोत्सवामध्ये काम करतो आहे. या अनुभवाने कलाकार आणि माणूस म्हणूनही मला समृद्ध केले.

 

 देखावा घडत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात?

दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा साकारताना त्या अर्थाने कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने साधनांची आणि मनुष्यबळाची कमतरता नसते. पारंपरिक सुतारांकडून काम करून घेणे कौशल्याचे काम असते. आपल्याला हवे तसे दुसऱ्याकडून करून घेण्याचे कसब साध्य करून हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतो. मला प्रदर्शन का भरवत नाही, असे अनेकजण विचारत असतात. तेव्हा ‘वर्षांतून एकदाच दहा दिवसांचे प्रदर्शन भरवतो. कोणालाही निमंत्रण न देता लाखो लोक हे प्रदर्शन पाहतात’, असे मी अभिमानाने त्यांना उत्तर देत असतो.

 

   युवा कलाकारांना अनुभवाचे बोल काय सांगाल?

‘गणेशोत्सव हा व्यवसायाचा भाग नाही तर हा कलेचा उत्सव आहे’, ही वडिलांनी दिलेली शिकवण मी कायमस्वरूपी ध्यानात ठेवून आचरणात आणली आहे. देखावा पाहिल्यानंतर रसिकांकडून मिळणारी दाद हीच आमच्या कलेची पावती असते. नव्या पिढीच्या कलाकारांनी गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर काम करावे. त्यातून ते कलाकार म्हणून समृद्ध होतील.

 

   (अंबाबाई मंदिर  || अमन विधाते)

गणेशोत्सवामध्ये सजावट करण्याच्या क्षेत्राकडे कसे आकर्षित झालात?

माझे वडील मोहन विधाते हे चित्रपटसृष्टीमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करत होते. मोहनजी अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कला क्षेत्राचा श्रीगणेशा गिरविला. १९८३ पासून मी या क्षेत्रात काम करत आहे. बी. कॉम. आणि एल. एल. बी. या पदव्या संपादन करताना लष्करामध्ये किंवा पोलीस दलामध्ये जाऊन सेवा करावी हे माझे स्वप्न होते. मात्र, ते साध्य होऊ शकले नाही. कदाचित मी कला क्षेत्रातच काम करावे ही गणरायाची इच्छा असावी.

 

पहिले स्वतंत्र काम कधी केले?

गोरेगाव (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी १९८५ मध्ये मी थर्माकोलचे मंदिर हा देखावा स्वतंत्रपणे साकारण्याचे काम केले होते. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. थर्माकोल आणण्यापासून ते मंदिर साकारण्यापर्यंत मंडळाने मला साडेचारशे रुपयांचे मानधन दिले होते. ही कला क्षेत्रातील माझी पहिली कमाई होती. अर्थात त्यावेळी साडेचारशे रुपयेदेखील खूप होते.

छत्रपती राजाराम मंडळाच्या कामाला कधीपासून सुरुवात केली?

पाच वर्षांपासून मी छत्रपती राजाराम मंडळाचे काम करतो आहे. जेजुरी येथील मल्हारगडावरील खंडोबाचे मंदिर, तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर, वेल्लूर येथील सुवर्णमंदिर आणि शिर्डी येथील साईबाबा मंदिर असे देखावे साकारले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकरआणि कार्यकर्त्यांचे संपूर्ण सहकार्य असते. आमचे देखावे चोखंदळ आणि चिकित्सक पुणेकरांना आवडले याचा मनापासून आनंद होत आहे.

भव्य देखावे कशा पद्धतीने साकारले जातात?

एक तर मंडळांना मंडपाची परवानगी मिळण्यासाठी वेळ लागतो. हाताशी कालावधी कमी असल्यामुळे येथे काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही मुंबई येथेच देखाव्याचे काम करतो आणि पुण्याला आणून ते बसवतो. वाहतुकीला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते. वाहतूक सुरळीत राहण्याबरोबरच अग्निशमन दलाचे वाहन आणि रुग्णवाहिका जाऊ शकेल, असा रस्ता सोडून उंचावर मंडपाची उभारणी केली जाते. देखाव्याचा डोलारा मंडपावरच अवलंबून असल्याने दुर्दैवाने अनुचित घटना घडू नये याची काळजी घेऊन प्रतिकृतीची बांधणी मजबूत करावी लागते. ही प्रतिकृती साकारल्यानंतर रसिकांची मिळणारी दाद हीच आमच्या कलेची पावती असते.

मुलाखत- विद्याधर कुलकर्णी