जुन्या कालव्यालगत शाळकरी मुलांच्या बुडाल्याच्या पाश्र्वभूमीवर अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर
हडपसर भागातील जुन्या कालव्यालगत अतिक्रमणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे खात्यातील कर्मचारी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून त्यामुळे तेथील लोकवस्तीही वाढली आहे. जुन्या कालव्यात शाळकरी मुले बुडाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर तेथील अतिक्रमणांचा प्रश्न समोर आला आहे.
[jwplayer 8cIf7m5X]
साडेसतरा नळी भागातील जुना कालवा ब्रिटिशकालीन आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कालवा बंद होता. मात्र, महापालिकेने मुंढव्यातील केशवनगर भागात जॅकवेल प्रकल्प उभारल्यानंतर तेथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वर्षभरापूर्वी ते जुन्या कालव्यात सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कालवा भरून वाहत आहे. मुंढवा, केशवनगर, शेवाळवाडी परिसरातील शाळकरी मुले कालवा ओलांडून शाळेत जातात. शाळेपासून घर जवळ असल्याने मुले मधल्या सुट्टीतही घरी येतात. गंमत म्हणून पाइपचा वापर करुन मुले कालवा ओलांडतात, अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली.
जुन्या कालव्यालगत पाटबंधारे खात्याचे कार्यालय आहे. साडेसतरा नळी, शेवाळवाडी, मांजरी भागात कालव्यालगत बेकायदेशी रीत्या घरे बांधण्यात आाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून कालव्यालगतची लोकवस्ती वाढली आहे. सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात घरे बांधली जातात. त्यासाठी पाटबंधारे खात्याच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते, असा आरोप करण्यात आला आहे. कालव्यालगत सुरुवातीला तात्पुरती व नंतर पक्की घरे बांधली जातात. अशा प्रकारे कालव्यालगतचे अतिक्रमण कायमस्वरूपी होते. कारवाईच्या नावाखाली फक्त नोटिसा बजावल्या जातात. मात्र, ठोस कारवाई केली जात नाही.
या भागात लोकवस्ती वाढल्यामुळे वरचेवर किरकोळ स्वरूपाच्या दुर्घटना कालव्यालगतच्या भागात घडतात. शाळकरी मुले कालव्यात पडणे, ज्येष्ठ नागरिक कालव्यात पडणे तसेच जनावरे कालव्यात पडण्याच्या घटना घडतात.
कालव्यालगतच्या भागात पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालणे गरजेचे आहे. तसेच तेथील अतिक्रमणांवर देखील त्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, पाटबंधारे खात्यातील कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप साडेसतरा नळी भागातील ग्रामस्थांनी केला आहे. कालव्यालगतच्या भागात मोठय़ा संख्येने लोकवस्ती वाढली आहे. या भागात राहणारे बहुतांश रहिवासी हे मजुरीकामामुळे स्थायिक झाले आहेत.
[jwplayer zkvFlBpu]