पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत आरोग्य क्षेत्रातील पात्रताधारक उमेदवारांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहेत. घरगुती सहायक या पदासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. इस्रायलमध्ये नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असण्यासह काळजीवाहू-घरगुती सहायक सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले आणि किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र असावे. तसेच, मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच, जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराकडे किमान तीन वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले त्या देशामध्ये सध्या कार्यरत नसावेत किंवा त्या देशाचे रहिवासी नसावेत अशी अट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांना https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अधिक माहितीसाठी रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकार आणि इस्रायल सरकार यांच्यात कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत करार करण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील नोकरीच्या संधींबाबत अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात फ्रेमवर्क, सिरॅमिक टायलिंग, प्लास्टरिंग, लोखंडी बेडिंग अशा कामांसाठी पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. त्यानंतर आता घरगुती सहायक पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.