पुणे : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर वाढत्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत कामगारमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर आणि गृह सचिवांची भेट घेतली. आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरू आहे. या विरोधात कर्मचाऱ्यांना कोणाकडेही दाद मागता येत नसल्याचा मुख्य मुद्दा या वेळी मांडण्यात आला.

आयटी क्षेत्रातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसोबत आयटी फोरमने मुंबईत मंत्रालयात कामगार मंत्र्यांची भेट घेतली. आयटी क्षेत्रातील कर्मचारी प्रश्न सातत्याने दुर्लक्षित राहिल्याची भूमिका या भेटीत आयटी फोरमने मांडली. अनेक आयटी कंपन्यांकडून योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे.

शिवाय, सक्तीच्या राजीनाम्यांच्या प्रकरणांमध्ये पोलीस तक्रारी नोंदविण्याची आवश्यकता असल्याचे फोरमने नमूद केले. देशातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील मोठ्या प्रमाणातील सक्तीचे राजीनामे तसेच इतर आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर नोकरी सोडण्यासाठी टाकला जाणारा दबाव, तसेच पार्श्वभूमी तपासणी, अंतिम तडजोड, कागदपत्रे न देणे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. पुढील पातळीवरील चर्चा करण्यासाठी आणखी बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गृहसचिवांनीही सक्तीच्या राजीनाम्यांबाबत पोलीस कारवाईसंदर्भात ठोस कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. ‘ही फक्त सुरुवात आहे. आयटी कर्मचार्‍यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील,’ असा निर्धार फोरमच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

फसवणुकीचे गंभीर प्रकार

आयटी क्षेत्रात पेड प्लेसमेंट देणाऱ्या आयटी सल्लागार कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांच्या चक्रव्यूहात शेकडो तरूण अडकून पडत आहेत. त्यांच्या भवितव्याशी एकप्रकारे हा खेळच सुरू आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये नुकताच असाच एक गैरव्यवहार समोर आला होता. पेड प्लेसमेंटच्या नावाखाली प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीने चारशे ते पाचशे तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. या तरुणांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून कंपनीने त्यांना  वाऱ्यावर सोडले. याप्रकरणी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.